दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही रशिया युक्रेन युद्ध सुरु आहे. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला चढवला होता. मात्र दोन महिन्यांनंतरही बलाढ्य रशियाला युक्रेनवर विजय मिळवता आला नाही. आता काळ्या समुद्रात गस्ती घालणाऱ्या रशियन युद्धनौका नष्ट केल्याचं युक्रेनने सांगितलं आहे. स्नेक बेटाजवळ युक्रेन सैनिकांनी शरणागती पत्कारण्यास नकार दिला. त्यानंतर युक्रेनने तुर्कीने बनवलेल्या लष्करी ड्रोनचा वापर करून दोन गस्ती नौकांवर हल्ला चढवला. यात दोन्ही युद्धनौका नष्ट झाल्या आहेत. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने सोशल मीडियावर वितरीत केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आज पहाटेच्या सुमारास स्नेक आयलँडजवळ दोन रशियन गस्ती नौका नष्ट झाल्या.”

संरक्षण मंत्रालयाने एका लहान लष्करी जहाजावर स्फोट झाल्याचे एरियल फुटेज देखील जारी केले. यात रडारवर रशियन नौका असल्याचं दिसत आहे. काही क्षणात ड्रोनच्या माध्यमातून दोन नौकांवर हल्ला चढवला जातो आणि नौका उद्ध्वस्त झाल्याचं दिसत आहे. युक्रेनियन सशस्त्र दलाचे कमांडर इन चीफ व्हॅलेरी झालुझ्नी यांनी तुर्कीने बनवलेल्या लष्करी ड्रोनचा संदर्भ देत निवेदनात म्हटल्याप्रमाणे “बायराक्तर काम करत आहेत.”

रॅप्टर गस्ती नौकेवर तीन क्रू आणि २० कर्मचारी असतात. सहसा मशीन गनसह सुसज्ज असतात आणि लँडिंग ऑपरेशनमध्ये वापरतात. हल्ल्यात दोन्ही नौका काळ्या समुद्रात बुडाल्याचं मॉस्कोकडून सांगण्यात आलं आहे. तसेच युक्रेनने युद्धनौकेवर क्षेपणास्त्रांचा मारा केल्याचे सांगितले.