रशिया आणि युक्रेनमधील संघर्षाला जवळपास आता चार वर्ष उलटले आहेत, पण अद्यापही दोन्ही देशातील संघर्ष पूर्णपणे संपलेला नाही. रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश सातत्याने एकमेकांच्या शहरांवर हवाई हल्ले करत आहेत. या दोन्ही देशांतील युद्धाचा जगावर देखील मोठा परिणाम होत आहे. रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष थांबवण्यासाठी काही महिन्यांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रयत्न केले होते. मात्र, त्यांच्या प्रयत्नाला यश आलं नाही.
दरम्यान, आता रशिया आणि युक्रेनमधील युद्ध पुन्हा एकदा भडकलं असून आज युक्रेनने रशियाची राजधानी मॉस्कोवर मोठा ड्रोन हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. युक्रेनने केलेल्या या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला असून ३ जण जखमी झाल्याची माहिती सांगितली जात आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
रशियातील भारतीय दूतावासाने काय माहिती दिली?
रशियातील भारतीय दूतावासाने म्हटलं की, “रविवारी रशियाच्या मॉस्को शहराच्या परिसरात झालेल्या ड्रोन हल्ल्यात एक भारतीय कामगार ठार झाला आहे. तसेच इतर तीन जण जखमी झाले आहेत. येथील अधिकाऱ्यांनी हल्ल्याच्या ठिकाणी भेट दिली असून जखमी कामगारांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे.”
दरम्यान, या हल्ल्यात जखमी झालेल्या तीन जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांच्याबाबत सविस्तर वैद्यकीय अहवालाची अद्याप प्रतीक्षा असून मृत व्यक्तीची ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, रशियात राहणाऱ्या इतर भारतीय व्यक्तींच्या सुरक्षेबाबत उच्चस्तरीय आढावा घेतला जात असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने काय म्हटलं?
“गेल्या २४ तासांत देशभरात १००० हून अधिक युक्रेनियन ड्रोन रोखण्यात आले आहेत”, असं रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे. तसेच मॉस्कोच्या महापौरांनी म्हटलं की, “हवाई संरक्षण यंत्रणांनी राजधानीच्या दिशेने येणारे किमान ८१ ड्रोन पाडले आहेत. या हल्ल्यांमुळे अनेक भागांतील निवासी इमारती आणि पायाभूत सुविधांचं नुकसान झालं आहे.” तसेच काही अधिकाऱ्यांनी सांगितलं की, “या हल्ल्यात किमान चार जण ठार झाले, ज्यात मॉस्कोतील तिघांचा समावेश आहे.”
मॉस्कोचे गव्हर्नर आंद्रेई वोरोब्योव्ह यांनी सांगितलं की, “मॉस्कोच्या उत्तरेकडील खिमकी येथे एका घरावर हल्ला झाल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. मायतिश्ची शहरातील एका गावात इतर दोन व्यक्ती ठार झाले आहेत. या हल्ल्यांमध्ये इतर अनेक जण जखमी झाले आहेत. काही जखमी मॉस्कोच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ आढळले आहेत.”
व्लादिमीर झेलेन्स्की यांनी काय म्हटलं?
मॉस्कोवर झालेल्या ड्रोन हल्ल्याबाबत युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर करत म्हटलं की, “रशियाने युद्ध लांबवल्याबद्दल आणि आमच्या शहरांवर व समुदायांवर केलेल्या हल्ल्यांबद्दल आता आम्ही दिलेला प्रतिसाद पूर्णपणे योग्य आहे. यावेळी युक्रेनचे दूर पल्ल्याचे हल्ले मॉस्कोपर्यंत पोहोचले आहेत आणि आम्ही रशियनांना सांगत आहोत की, त्यांच्या देशाने युद्ध थांबवलंच पाहिजे. युक्रेनचे ड्रोन आणि क्षेपणास्त्र उत्पादक त्यांचे काम सुरू ठेवत आहेत. मी युक्रेनच्या सुरक्षा सेवेचा आणि युक्रेनच्या सर्व संरक्षण दलांचा त्यांच्या अचूकतेबद्दल कौतुक करत आहे. मॉस्को प्रदेशात रशियन हवाई संरक्षणाची सर्वाधिक तैनाती आहे. पण आम्ही त्यावर मात करत आहोत.”
रशिया-युक्रेन युद्धाचा शेवट कधी?
रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्याच्या घटनेला चार वर्षे पूर्ण झाले आहेत. या चिघळलेल्या युद्धामुळे जागतील राजकारण, ऊर्जा आणि संरक्षण क्षेत्रही बदलले आहे. उत्तर अटलांटिक करार संघटना अर्थात ‘नेटो’चे युरोपीय सदस्य देश पारंपरिक युद्धाची शक्यताच आता संपुष्टात आल्याचे गृहीत धरून आपापले संरक्षण उद्योग आणि शस्त्रास्त्रांचे साठे वाढवत आहेत. आता या युरोपीय देशांना पुन्हा एकदा संरक्षणसिद्धतेवर लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. त्यासाठी आणखी एखाद दशक तरी लागेल. त्यापायी या देशांचे आर्थिक आणि राजकीय प्राधान्यक्रमही बदलण्याची शक्यता आहे. रशिया-युक्रेन युद्धात ड्रोनसारख्या अत्याधुनिक उपकरणांचा वापर होत आहे.
ड्रोन-युद्ध युगाचा आरंभ?
लष्करी इतिहासात पहिल्यांदाच मानवरहित हवाई वाहने पारंपरिक युद्धभूमीवर प्रबळ ठरली. युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांनी या युद्धात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या ड्रोनचा वापर केला. युद्ध सुरू झाल्यापासून अधिकाधिक विकसित ड्रोनने हल्ले करण्यात आले. युद्धसामग्रीच्या या बदलाचे परिणाम गंभीर आहेत. मोठ्या संख्येने जवानांचा माग काढणे या ड्रोनना सहजशक्य आहे, त्यामुळे मनुष्यबळ न गमावता विरुद्ध पक्षाच्या सैनिकांना लक्ष्य करणे शक्य झाले आहे. परिणामी भविष्यात संरक्षण सामग्रीमध्ये ड्रोनची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे. आधुनिक युद्धे लहान, अचूक आणि महागड्या, मर्यादित उच्च-तंत्रज्ञानाच्या शस्त्रास्त्रांनी लढली जातील या गृहीतकाला रशिया-युक्रेन युद्धाने छेद दिला आहे.
