कीव्ह : रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी प्रस्तावित शांतता प्रस्तावाचा भाग म्हणून अमेरिकेने आपल्याला १५ वर्षे सुरक्षेची हमी दिली आहे, अशी माहिती युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सोमवारी दिली. मात्र, रशियाने पुढील किमान ५० वर्षे तरी आपली भूमी बळकावण्याचा आणखी प्रयत्न करू नये यासाठी अमेरिकेने कटिबद्धता दाखवली असती तर आपल्याला अधिक आवडले असते, असे झेलेन्स्की म्हणाले.

वोलोदिमिर झेलेन्स्की शांतता चर्चेसाठी रविवारी अमेरिकेत होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या फ्लोरिडातील रिसॉर्टमध्ये त्यांचे स्वागत केले. शांतता समझोता होण्याच्या दृष्टीने युक्रेन आणि रशिया आतापर्यंत सर्वाधिक जवळ आले आहेत, असे ट्रम्प यावेळी म्हणाले. रशियाने युक्रेनवर फेब्रुवारी २०२२मध्ये आक्रमण केले. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत.

ट्रम्प यांच्या पुढाकाराने सध्या सुरू असलेल्या शांतता चर्चेत महत्त्वाच्या मुद्द्यांवर सहमती घडवण्यासाठी वाटाघाटी करणाऱ्या अधिकाऱ्यांना अद्याप यश आलेले नाही. तसेच, काही महिन्यांपासून सुरू असलेली ही शांतता चर्चा कधीही अपयशी होऊ शकते असे मत ट्रम्प यांनी नोंदवले आहे. तर सुरक्षेच्या हमीशिवाय हे युद्ध थांबणार नाही, असे झेलेन्स्की यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना सांगितले.

या सुरक्षा हमीचे तपशील अद्याप सार्वजनिक करण्यात आलेले नाहीत. पण झेलेन्स्की यांनी सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, त्यामध्ये शांतता करारावर देखरेख ठेवली जाईल, तसेच सैन्याच्या तैनातीचा मुद्दाही समाविष्ट असेल. याबद्दल झेलेन्स्की यांनी अधिक काही सांगितले नाही, पण युक्रेनमध्ये नाटोचे सैन्य तैनात केल्यास ते आपल्याला अमान्य असेल, असे रशियाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे, रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात लवकरच चर्चा होईल, असे क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्र पेस्कोव्ह यांनी सांगितले. पण पुतिन आणि झेलेन्स्की यांच्यात चर्चेच्या कोणत्याही शक्यतेबद्दल त्यांनी काही सांगितले नाही.

या मुद्द्यांवर सहमतीचा अभाव

– रशिया आणि युक्रेनने आपापले सैन्य कुठल्या प्रदेशातून माघारी घ्यावे

– जगातील पहिल्या १० अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये समावेश होणाऱ्या आणि रशियाच्या ताब्यात असलेल्या झापोरिझिया प्रकल्पाचे भवितव्य काय असेल