फ्रान्समध्ये ७५ व्या कान्स फिल्म महोत्सवास मंगळवारी सुरुवात झाली. युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी व्हिडिओद्वारे आश्चर्यचकितपणे महोत्सवास हजेरी लावली. रशियाचा सामना करणाऱ्या युक्रेनच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याची विनंती झेनेन्स्की यांनी चित्रपट सृष्टीला केली आहे. महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात, झेलेन्स्की यांनी सिनेमा आणि वास्तव यांच्यातील संबंधांबद्दल भाष्य केलं. फ्रान्सिस फोर्ड कोपोलाच्या “अपोकॅलिप्स नाऊ” आणि चार्ली चॅप्लिनच्या “द ग्रेट डिक्टेटर” सारख्या चित्रपटांचा संदर्भ देत युक्रेनची सध्याची परीस्थिती वेगळी नसल्याचेही झेनेन्स्की म्हणाले.

यावेळी एका नवीन चॅप्लिनची गरज आहे
कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या उद्घाटन समारंभात अध्यक्ष झेलेन्स्की यांनी महान कॉमेडियन चार्ली चॅप्लिन यांचा उल्लेख केला. झेलेन्स्कीने द ग्रेट डिक्टेटर चित्रपटातील त्यांचे अंतिम भाषण वाचून दाखवले की पुरुषांचा द्वेष संपेल आणि हुकूमशहा मारले जातील. त्यांनी घेतलेली सत्ता जनतेकडे परत येईल. चार्ली चॅप्लिनच्या जर्मन हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलरवरील व्यंगचित्राचेही त्यांनी कौतुक केले. झेलेन्स्की म्हणाले की, आम्हाला यावेळी एका नवीन चॅप्लिनची गरज आहे, जो हे दाखवेल की, आजच्या काळातला आमचा सिनेमा शांत नाही.

चित्रपटसृष्टीतील कलाकारांना पाठिंबा देण्याचे आवाहन
युक्रेनमधील युद्धाकडे लक्ष वेधण्यासाठी वोलोडिमिर झेलेन्स्कीने आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात हजेरी लावण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या महिन्यात, व्होलोडिमिर झेलेन्स्कीने ६४ व्या वार्षिक ग्रॅमी पुरस्कारादरम्यान एक व्हिडिओ संदेश दिला होता. त्यांनी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना आपल्या देशाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.