scorecardresearch

Ukraine War: “…तर रशियाची क्षेपणास्त्रं ‘नेटो’च्या सदस्य देशांवरही पडतील”; युक्रेननं दिला इशारा

पोलंडच्या सीमेपासून ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या याव्होरिव्ह येथे रविवारी क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्यानंतर युक्रेननं दिला इशारा

zelenskyy
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दिलेल्या भाषणादरम्यान व्यक्त केली भीती (फाइल फोटो)

पोलंड सीमेजवळील युक्रेनच्या लष्करी प्रशिक्षण तळावर रशियाने रविवारी हल्ला केला. क्रूझ क्षेपणास्त्रांनी केलेल्या या हल्ल्यात ३५ जणांचा मृत्यू झाला, तर १३४ जखमी झाले. पोलंड ‘नेटो’चा सदस्य असून त्या देशाच्या सीमेलगतचा हा प्रशिक्षण तळ युक्रेनला पाश्चिमात्य मदत पुरवण्यासाठीचे प्रमुख केंद्र असल्याने रशियाने या तळावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी नेटो देशांना रशिया लवकरच नेटो देशांवर हल्ले करेल असा इशारा दिलाय. 

रविवारी रशियाकडून पोलंड आणि युक्रेनच्या सीमा भागांमध्ये झालेल्या हल्ल्यांनंतर व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधणाऱ्या झेलेन्स्की यांनी पुन्हा एकदा नेटो देशांना त्यांच्या नो फ्लाय झोन घोषित करण्याच्या मागणीची आठवण करुन दिली. ही मागणी नेटोने यापूर्वी फेटाळली होती. मात्र त्यामुळेच रशियाने अशाप्रकारे थेट युक्रेन-पोलंडच्या सीमा भागांमध्ये हल्ला केल्याचा झेलेन्सी यांच्या टीकेचा एकंदरीत सूर होता.

“तुम्ही आमच्या देशावरील हवाई क्षेत्रावर उड्डाणास बंदी घातली नाही (नो फ्लाय झोन घोषित केलं नाही) तर काही काळामध्ये रशियाची क्षेपणास्त्र तुमच्या प्रांतावर म्हणजेच नेटोच्या देशांमध्ये पडली. नेटो देशातील नागरिकांवर पडतील. नेटोला मी यापूर्वीही इशारा दिला होता की निर्बंध लागू केले नाहीत तर रशिया युद्धा सुरु करेल. मास्को या युद्धामध्ये नॉर्न स्ट्रीम २ चा वापर शस्त्राप्रमाणे करेल हा इशारा आधी दिलेला,” असं झेलेन्स्की म्हणाले असल्याचं एएफपी या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तात म्हटलंय.

रशियाच्या आक्रमणाचा प्रतिकार करणाऱ्या युक्रेनच्या सैनिकांना होणाऱ्या परदेशी शस्त्रास्त्र पुरवठ्याला लक्ष्य करण्याची धमकी रशियाने दिली होती. त्यानंतर पोलंडच्या सीमेजवळ असणाऱ्या युक्रेनच्या या महत्त्वाच्या लष्करी तळावर रशियाने क्षेपणास्त्रांचा मारा केला. त्यात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली.

‘‘रशियन सैन्याने ल्विव्ह शहराच्या वायव्येकडील ३० किलोमीटर आणि पोलंडच्या सीमेपासून ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या याव्होरिव्ह लष्करी तळावर ३० हून अधिक क्रूझ क्षेपणास्त्रे डागली’’, अशी माहिती ल्विव्ह प्रांताचे गव्हर्नर मॅक्सिम कोझित्स्की यांनी दिली. रशियाने रविवारी डागलेली बहुतेक क्षेपणास्त्रे युक्रेनच्या हवाई हल्ला संरक्षण प्रणालीद्वारे पाडण्यात आली. पंरतु एका क्रूझ क्षेपणास्त्राने ३५ लोकांचा बळी घेतलो, असेही त्यांनी सांगितले. युक्रेनच्या सैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी अमेरिका आणि ‘नेटो’ने याव्होरिव्ह लष्करी तळाचा वापर केला आहे. तेथे ‘नेटो’च्या लष्करी कवायतीही केल्या जातात. त्याला आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा केंद्र म्हणूनही ओळखले जाते.

विशेष म्हणजे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नेटो विरुद्ध रशिया असा संघर्ष झाल्यास ते तिसरं महायुद्ध असेल असा इशारा दिल्याच्या दिवशीच झेलेन्स्कींनी रशिया नेटोच्या सदस्य देशांवर हल्ला करेल ही भीती व्यक्त केलीय.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ukraine president volodymyr zelenskyy urges ukraine no fly zone or russian rockets will fall on nato soil scsg

ताज्या बातम्या