Ukraine Russia War News : गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ चालू असलेल्या युक्रेन-रशियामध्ये आता महिन्याभराकरता युद्धबंदी लागू करण्यात येणार आहे. अमेरिकेने कीवला लष्करी मदत आणि गुप्तचर माहिती देण्यावरील बंदी उठवल्याची घोषणा केल्यानंतर युक्रेनने तत्काळ युद्धबंदी लागू करण्यास तयारी दर्शवली. यासंदर्भात सौदी अरेबियामध्ये अमेरिका आणि युक्रेनियन अधिकाऱ्यांमध्ये उच्चस्तरीय चर्चाही करण्यात आली. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं.

व्हाईट हाऊस आणि कीव यांच्या संयुक्त निवेदनानुसार, युद्धबंदी प्रस्तावात तात्पुरती युद्धबंदीची तरतूद आहे, जी दोन्ही बाजूंनी मान्य केल्यास वाढवता येऊ शकते. या वर्षाच्या सुरुवातीला डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने पदभार स्वीकारल्यानंतरचा हा पहिलाच महत्त्वाचा राजनैतिक प्रयत्न आहे. युक्रेनने या योजनेशी आपली वचनबद्धता दर्शविली असली तरी, आता सर्वांच्या नजरा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या प्रतिक्रियेवर आहेत.

…तर अनेक लोक मारले जातील

“आम्ही आज आणि उद्या रशियन लोकांना भेटणार आहोत आणि आशा आहे की आम्ही एक करार करू शकू”, ट्रम्प यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले. “जर आपण रशियाला यु्द्धबंदी करायला लावू शकलो तर ते खूप चांगले होईल. पण युद्धबंदी लागली नाही तर अनेक लोक मारले जातील”, असंही ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये चर्चा झाली. युक्रेनला अमेरिकेकडून होत असलेली मदत थांबवण्यात आली आली होती. लष्करी उपकरणे आणि गुप्तचर यंत्रणेच्या पुरवठ्यावर बंदी घातल्यामुळे युरोपीय मित्र राष्ट्रांकडून तीव्र टीका झाली होत. “आता युक्रेनने युद्धबंदीला सहमती दर्शविल्यानंतर अमेरिकेने आपला लष्करी पाठिंबा पुन्हा सुरू केला आहे. ही संपूर्ण युद्धबंदी आहे. युक्रेनने त्यावर सहमती दर्शविली आहे. आशा आहे की, रशिया देखील त्यावर सहमत होईल”, असं ट्रम्प म्हणाले. हे प्रकरण आता मॉस्कोच्या कोर्टात आहे.

ट्रम्पचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ हे येत्या काही दिवसांत पुतिन यांना थेट प्रस्ताव सादर करण्यासाठी मॉस्कोला जाणार असल्याची अपेक्षा आहे, तर ट्रम्प स्वतः या आठवड्याच्या अखेरीस रशियन राष्ट्राध्यक्षांशी बोलणार आहेत. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी रशियाच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित करत म्हटले आहे की जर मॉस्कोने युद्धबंदी नाकारली तर शांततेच्या मार्गात कोण अडथळा आणत आहे हे स्पष्ट होईल.