रॉयटर्स, कीव्ह : रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेने दिलेला शांतता प्रस्ताव एका आठवड्याच्या आत स्वीकारावा, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्लोदोमिर झेलेन्स्की यांना शुक्रवारी बजावले. अमेरिकेच्या या आग्रहामुळे आपली कोंडी झाल्याचे झेलेन्स्की यांनी सूचित केले आहे. दुसरीकडे, रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीसाठी अजूनही प्रयत्न सुरू असल्याची माहिती रशियाचे उपपरराष्ट्र मंत्री सर्गेई रायबकोव्ह यांनी दिली आहे.
अमेरिकेने शांतता प्रस्ताव सादर केल्यानंतर झेलेन्स्की यांनी देशवासीयांना उद्देशून भाषण केले. त्यामध्ये ते म्हणाले की, “युक्रेनसोर अतिशय कठीण पर्याय आहेत – एकतर स्वतःची प्रतिष्ठा गमावणे अन्यथा एक महत्त्वाचा भागीदार देश (अमेरिका) गमावण्याची जोखीम पत्करणे. युक्रेनची प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्य याकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी मी २४ तास लढा देईन.” अशा प्रकारचे शांतता प्रस्ताव आपल्यासाठी शरणागतीच्या योजना आहेत, असे म्हणत झेलेन्स्की यांनी यापूर्वी हे प्रस्ताव फेटाळले आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी ‘फॉक्स न्यूज रेडिओ’ला सांगितले की, युक्रेनने गुरुवारपर्यंत हा प्रस्ताव स्वीकारणे योग्य राहील, असे आपल्याला वाटते. ट्रम्प नंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, हिवाळा लवकरच सुरू होत आहे, अशा वेळी हा रक्तपात थांबवणे आवश्यक आहे. झेलेन्स्की शांतता प्रस्ताव स्वीकारतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. “तुमच्याकडे हुकुमाचे पत्ते नाहीत असे मी त्यांना फेब्रुवारीमध्येच बजावले होते,” अशी आठवणही ट्रम्प यांनी करून दिली.
युक्रेनचे सार्वभौमत्व कायम राहील आणि दोन्ही देशांना स्वीकार्य असेल अशा प्रकारे युद्धसमाप्तीची योजना आहे, असे अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी शुक्रवारी सांगितले. मात्र, अमेरिका आपल्याला अधिक पैसे किंवा शस्त्रास्त्रे देईल किंवा रशियावर अधिक निर्बंध लादेल आणि आपला विजय होईल हा युक्रेनचा गैरसमज आहे, असेही व्हान्स यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये स्पष्ट केले.
झेलेन्स्की यांना हा प्रस्ताव आवडून घ्यावाच लागेल. जर त्यांना तो आवडला नाही तर मला वाटते त्यांना फक्त लढत राहावे लागेल. त्यांनी आतापर्यंत जे स्वीकारले नाही, ते त्यांना कधी ना कधी स्वीकारावेच लागणार आहे. – डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका
