एक्स्प्रेस वृत्तसेवा, नवी दिल्ली : अमेरिकेने रशियावर घातलेले निर्बंध अयशस्वी ठरवण्याचे प्रयत्न करणाऱ्या देशांना ‘परिणामांना तोंड देण्याची’ तयारी ठेवावी लागेल, असे रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह दिल्लीत येऊन पोहोचण्याच्या काही वेळ आधी अमेरिकेचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार दलीप सिंग यांनी सांगितले. रशियावरील निर्बंधांचे ते प्रमुख शिल्पकार मानले जातात
चीन व रशिया या दोघांनीही आपसातील संबंधांचे वर्णन ‘अमर्याद’ असे केले असताना, त्यांच्या संबंधांचे भारतावर परिणाम होतील, असे सिंग म्हणाले. चीनसोबतच्या संबंधात रशिया हा ‘कनिष्ठ भागीदार’ असेल. चीनने प्रत्यक्ष ताबारेषेचा पुन्हा एकदा भंग केला, तर रशिया भारताच्या मदतीसाठी धावून येईल असे कुणीही समजू नये. त्यामुळेच, जगभरातील लोकशाही राष्ट्रांनी, विशेषत: क्वाड देशांनी एकत्र येऊन युक्रेनमधील घडामोडी आणि त्यांचे परिणाम याबाबत आवाज उठवायला हवा, असेही सिंग यांनी सांगितले. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यासह इतर नेत्यांबद्दलच्या निर्बंधांचे शिल्पकार असलेले सिंग यांनी पंतप्रधान कार्यालयातील तसेच अर्थ आणि परराष्ट्र व्यहार मंत्रालयांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली.
युक्रेन- रशिया यांच्यात आज पुन्हा चर्चा
संभाव्य शांतता करारासाठी युक्रेन व रशिया यांच्यातील चर्चा शुक्रवारी व्हिडीओद्वारे पुन्हा सुरू होतील, असे युक्रेनी प्रतिनिधी मंडळाच्या प्रमुखांनी म्हटले आहे. ही माहिती देणारे डेव्हिड अरखामिआ हे युक्रेनी प्रतिनिधी मंडळात असून, ते संसदेत सत्ताधारी पक्षाचे नेतृत्वही करतात. दोन आठवडे व्हिडीओच्या माध्यमातून बोलणी झाल्यानंतर दोन्ही देशांच्या प्रतिनिधी मंडळाची गुरुवारी इस्तंबूलमध्ये प्रत्यक्ष भेट झाली आणि संभाव्य शांतता कराराची अस्पष्ट रूपरेषा प्रकट होत असल्याचे दिसू लागले.
रशियाने दीर्घकाळापासून मागणी केल्यानुसार, युक्रेन नाटोमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न सोडून देऊन स्वत:ला तटस्थ असल्याचे जाहीर करेल, अशी चौकट युक्रेनी प्रतिनिधी मंडळाने मांडली आहे. याच्या मोबदल्यात, इतर देशांच्या एका गटाकडून सुरक्षाविषयक हमी मिळावी अशी त्याची अपेक्षा आहे. रशियाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनी युक्रेनच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.