scorecardresearch

सुमीमधून ६९४ भारतीय विद्यार्थ्यांची सुटका!

मंगळवारी येथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेचा मार्ग दिसू लागल्याने सर्वानीच नि:श्वास सोडला.

सुमी : सुमी शहरातून अडकलेल्या नागरिकांना स्थलांतरीत करण्याचा पहिला टप्पा सुरू झाल्याची माहिती युक्रेन सरकारने मंगळवारी दिली. यात ६९४ भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

युक्रेनच्या माहिती आणि प्रसारण विभागाने या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे, की सुमी शहरातून सुरक्षित मार्ग (ग्रीन कॉरिडॉर) देण्यात आला असून, येथून स्थलांतराचा पहिला टप्पा सुरू झाला.  केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी पत्रकारांना सांगितले की, सुमीमध्ये ६९४  भारतीय विद्यार्थी अडकले होते. ते मंगळवारी बसने पोल्टावाला सुरक्षित स्थळी रवाना झाले.

रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांना वारंवार आग्रह करूनही सुमी शहरात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित मार्ग तयार झाला नसल्याबद्दल संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेत याआधी भारताने चिंता व्यक्त केली होती. मात्र, मंगळवारी येथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेचा मार्ग दिसू लागल्याने सर्वानीच नि:श्वास सोडला. त्यांना लवकरच पोल्टावा येथे आणण्यात येईल. त्याबाबत प्रक्रिया मंगळवारी सुरू झाली. 

दुसऱ्या महायुद्धानंतरचे मोठे स्थलांतर!

दरम्यान, युक्रेनमधून स्थलांतरीत होणाऱ्या निर्वासितांची संख्या २० लाखांपर्यंत पोहोचल्याचे वृत्त असून संयुक्त राष्ट्र संघटनेने दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर युरोपमध्ये झालेल्या निर्वासित स्थलांतरानंतर हे सर्वात मोठे आणि कमी काळात झालेले स्थलांतर आहे.

सुमीत २१ नागरिकांचा मृत्यू सुमी रशियन हवाई हल्ल्यात दोन मुलांसह किमान २१ नागरिकांचा मृत्यू झाला. सोमवारी उशिरा युक्रेनच्या ईशान्य भागात असलेल्या सुमी शहरातील निवासी भागात हा हल्ला करण्यात आल्याची माहिती सरकारी विभागाच्या निवेदनात देण्यात आली. 

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ukraine russia war 694 indian students stranded in sumy evacuated zws

ताज्या बातम्या