scorecardresearch

“तुम्ही मंगळ ग्रहावर वसाहत…”, युक्रेनच्या उपपंतप्रधानांचं ‘ते’ आवाहन ज्यामुळे एलोन मस्कने केली मोठी मदत

युक्रेनच्या डिजीटल ट्रान्सफॉर्मेशन मंत्र्यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलोन मस्क यांना टॅग करत असं काही आवाहन केलं, की मस्क यांनी पुढील १० तासात युक्रेनमध्ये २,००० उपग्रहांच्या समुहाचं संचालन करणारी स्टारलिंक ब्रॉडबँड सेवा सुरू केली.

रशियाने शक्तिशाली सैन्याच्या जोरावर युक्रेनवर हल्ला केला आणि युक्रेनची यंत्रणा उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली. युक्रेनला जगापासून तोडण्यासाठी रशियाने युक्रेनच्या ब्रॉडबँड सेवेची यंत्रणाही बेचिराख करण्यास सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर युक्रेनचे उपपंतप्रधान आणि डिजीटल ट्रान्सफॉर्मेशन मंत्री मिकायलो फेडोरोव्ह यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलोन मस्क यांना टॅग करत असं काही आवाहन केलं, की मस्क यांनी पुढील १० तासात युक्रेनमध्ये २,००० उपग्रहांच्या समुहाचं संचालन करणारी स्टारलिंक ब्रॉडबँड सेवा सुरू केली. यामुळे युक्रेनचा जगाशी संपर्क तोडण्याचा रशियाचा हेतू अपूर्ण राहणार आहे.

युक्रेनच्या मंत्र्यांनी नेमकं काय आवाहन केलं होतं?

युक्रेनच्या डिजीटल ट्रान्सफॉर्मेशन मंत्री म्हणाले होते, “तुम्ही मंगळ ग्रहावर वसाहत तयार करण्याचा प्रयत्न करत असताना इथं रशिया युक्रेनवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. तुमचे रॉकेट यशस्वीपण अंतराळात स्थिरावत असताना रशिया युक्रेनच्या नागरिकांवर हल्ला करत आहे. आम्ही युक्रेनला तुमच्या स्टारलिंक स्टेशनची सेवा देण्याची विनंती करतो.”

एलोन मस्क यांनी स्वतः युक्रेनच्या डिजीटल ट्रान्सफॉर्मेशन मंत्र्यांच्या ट्वीटला प्रतिसाद देत युक्रेनमध्ये स्टारलिंक सेवा सुरू केल्याची माहिती दिली. युक्रेनच्या मंत्र्यांनी मदतीची मागणी केल्यानंतर १० तासात एलोन मस्क यांनी युक्रेनमध्ये ही सेवा सुरू झाल्याचं कळवलं.

युक्रेनसाठी एलोन मस्क यांची ही मदत महत्त्वाची का?

रशियाने युक्रेनला नमवण्यासाठी केवळ जमिनीवरील सैन्य कारवाईच केलेली नाही, तर युक्रेनची डिजीटल यंत्रणा उद्ध्वस्त करून चारही बाजूने कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय. याचाच भाग म्हणून रशियाकडून युक्रेनच्या इंटरनेट सेवा आणि ब्रॉडबँड सेवा देणाऱ्या यंत्रणा देखील उद्ध्वस्त केल्या जात आहेत. असं झाल्यास युक्रेनचा उर्वरित जगाशी संपर्कच तुटून जाईल आणि युक्रेनला कोणतीही मदत मिळणार नाही, असाही प्रयत्न होत असल्याचं जाणकार सांगत आहेत. त्यामुळेच युक्रेनच्या मंत्र्यांनी थेट एलोन मस्क यांना मदतीची विनवणी केली.

हेही वाचा : धक्कादायक! युक्रेन-पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण

स्टारलिंक काय आहे?

स्टारलिंक स्पेसएक्सच्या जवळपास २,००० उपग्रहांच्या समुहाचं संचालन करणारं अंतराळातील स्टेशन आहे. संपूर्ण पृथ्वीवर इंटरनेट सेवा पुरवणे हा या स्टेशनचा उद्देश आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ukraine vice prime minister appeal after which elon musk help amid russia attack pbs