Zelensky Hopes For Putin’s Death In Christmas Address: रशियाने युक्रेनवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले सुरू ठेवल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी ख्रिसमसच्या संदेशात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या मृत्यूची इच्छा व्यक्त केली आहे. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला त्यांनी एक्सवर शुभेच्छा संदेशचा व्हिडीओ शेअर केला आहे. या संदेशात त्यांनी युक्रेनवासियांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देत असताना दोन वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या युद्धावरही भाष्य केले आणि त्यांचा (पुतिन) नाश होवो, असे म्हटले.

“रशियाने लादलेल्या दुःखानंतरही ते सर्वात महत्त्वाच्या गोष्टींवर ताबा मिळवण्यात आणि बॉम्बवर्षाव करण्यात अपयशी ठरले आहेत. ते म्हणजे युक्रेनियन हृदय, युक्रेनी लोकांचा एकमेकांवर असलेला विश्वास आणि एकता त्यांना तोडता आलेली नाही”, असे सांगून झेलेन्स्की यांनी पुढे व्लादिमीर पुतिन यांचा नाव न घेता उल्लेख केला.

झेलेन्स्की पुढे म्हणाले, “आज आपण सर्वजन एक स्वप्न पाहत आहोत आणि एकच इच्छा व्यक्त करत आहोत. आपल्या सर्वांसाठी त्यांचा नाश व्हावा. आपण जेव्हा देवाकडे वळतो, तेव्हा अर्थातच काहीतरी मागत असतो. आपण युक्रेनसाठी शांतता मागू. आपण त्यासाठी लढू, प्रार्थना करू.” मंगळवारी रशियाने युक्रेनमधील काही प्रदेशांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनने हल्ला केला. यात किमान तीन जणांचा मृत्यू झाला. यानंतर झेलेन्स्की यांची ही टिप्पणी समोर आली आहे.

पाहा व्हिडीओ – ६ मिनिट ३० व्या सेकंदाला उल्लेख

झेलेन्स्की यांनी आपल्या संदेशात म्हटले की, ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला रशियन्सनी पुन्हा एकदा दाखवून दिले की, ते खरोखरच कोण आहेत. प्रचंड गोळीबार, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, किन्झल स्ट्राइक.. सर्वकाही त्यांनी वापरले. आपल्या शहीद वीरांनी जीवाची बाजी लावून युक्रेनचे रक्षण केले. रशियाने ज्यांना ताब्यात घेतले त्या सर्वांसाठीही आज प्रार्थना करुयात.”

प्रचंड दबावानंतरही युक्रेनमधील लोकांनी आपल्या मनातील युक्रेन गमावले नाही. म्हणूनच युक्रेन आपण कधीही प्रत्यक्षा गमावणार नाहीत. आज आपण सर्व खांद्याला खांदा लावून उभे आहोत. या काळोखातही आपला मार्ग आपण शोधू, असेही झेलेन्स्की आपल्या संदेशात म्हणाले.

Zelensky make a wish death to Putin
झेलेन्स्की यांनी आपल्या संदेशात उच्चारलेले वाक्य

मागच्या महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध संपविण्याची योजना सादर केल्यानंतर अमेरिकेने वाटाघाटीसाठी युक्रेन आणि रशियाशी स्वतंत्रपणे चर्चा सुरू केली आहे. वाटाघाटीचा प्रस्ताव रशियाच्या बाजूने झुकलेला आहे, अशी भीती युक्रेनला वाटत आहे.