ब्रेग्झिटनंतर : अर्थव्यवस्था मजबूत, नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्यास वेळ लागेल- ओसबोर्न

ब्रेग्झिटनंतर पंतप्रधान डेव्हीड कॅमेरॉन यांनी पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.

 

ब्रेग्झिटनंतर ब्रिटनला अडचणी येणार नाहीत कारण अर्थव्यवस्था मजबूत आहे असे ब्रिटनचे अर्थमंत्री जॉर्ज ओसबोर्न यांनी सांगितले. अर्थव्यवस्था मजबूत असली तरी नवीन परिस्थितीशी जमवून घेण्यात वेळ जाईल असे ते म्हणाले.

ब्रिटनने युरोपीय महासंघात रहावे या मताचे असलेल्या ओसबोर्न यांनी अखेर मौन सोडले असून त्यांनी सांगितले की, ब्रेग्झिटमुळे आर्थिक फटका बसेल असा इशारा दिला होता. सार्वजनिक वित्तपुरवठा व इतर बाबी यात महत्त्वाच्या असून गुरुवारच्या मतदानानंतर फटका बसणे साहिजकच होते. आमची अर्थव्यवस्था मजबूत आहे पण आता नवीन आव्हाने असल्याने परिस्थितीशी जुळवून घेण्यात वेळ लागेल. युरोपीय महासंघातून कधी बाहेर पडणार असे विचारले असता त्यांनी सांगितले की, नवीन पंतप्रधान ते ठरवतील. लिस्बन कराराच्या कलम ५० ची अंमलबजावणी ब्रिटन करू शकतो व इतर युरोपीय देशांबरोबर नवीन व्यवस्था निर्माण कराव्या लागतील. त्यानंतरच्या वाटाघाटीत लोकांचे प्रवास हक्क, वस्तू व सेवा व्यापार यात फारसा फरक होणार नाही. ब्रेग्झिटनंतर पंतप्रधान डेव्हीड कॅमेरॉन यांनी पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. आपत्कालीन असा कुठलाही अर्थसंकल्प आता शक्य नसल्याचे ओसबोर्न यांनी सांगितले. ब्रिटनमधील उद्योगांनी आधीच असा इशारा दिला आहे की, ब्रेग्झिटमुळे गुंतवणूक कमी होईल व रोजगारातही कपात होईल.

स्टर्लिगची विक्रमी घसरण

ब्रेग्झिटमुळे ब्रिटनमध्ये स्टर्लिग आज तीस वर्षांत डॉलर्सच्या तुलनेत नीचांकी घसरला आहे. बँका, हवाई कंपन्या, मालमत्ता कंपन्या यांचे शेअर्स घसरले. २३ जूनच्या ब्रेग्झिटनंतर जगात इतर बाजारपेठा सावरल्या असल्या तरी अनिश्चिततेचे सावट कायम आहे. लंडन बाजारपेठेत पाउंड डॉलरच्या तुलनेत १.३२२२ इतका घसरला. सप्टेंबर १९८५ नंतर प्रथमच एवढी घसरण झाली.

ब्रेग्झिटचा ताप अन् आता पश्चात्ताप

ब्रसेल्स- गेल्या आठवडय़ातील ब्रेग्झिट जनमताची अंमलबजावणीच होणार नाही म्हणजेच त्याची औपचारिक अंमलबजावणी ब्रिटनच सुरू करणार नाही, असे युरोपीय महासंघाच्या राजनीतीज्ञांनी म्हटले आहे. अनेक ब्रिटिश नागरिकांनी ब्रेग्झिटबाबत पश्चात्ताप वाटत असल्याचे ई-मेल युरोपीय महासंघाला पाठवले आहेत.  एका शक्यतेनुसार ख्रिसमसच्या सुमारास ब्रेग्झिटसाठी कलम ५० लागू करण्याची अधिसूचना लागू होऊ शकते. गुप्ततेच्या अटीवर एका अधिकाऱ्याने सांगितले की, माझ्या व्यक्तिगत विश्वासानुसार ब्रेग्झिटची अधिसूचनाच निघणार नाही. लिस्बन करार कलम ५० अनुसार अधिसूचना ब्रिटनला काढावी लागेल तरच त्यांना बाहेर पडता येईल. कलम ५० लागू करावे अशी ब्रिटनकडून अपेक्षा आहे, पण ते तसे करणार नाहीत असे माझे व्यक्तिगत मत आहे. ब्रिटिश लोकांकडून युरोपीय महासंघाला हजारो ई-मेल गेले असून त्यात त्यांनी महासंघातच राहण्याची मागणी केली आहे, पश्चात्तापाची भावना व्यक्त केली आहे. ब्रिटनकडून नेहमी द्वेषमूलक ई-मेल येत होते, पण आता त्यांना प्रेमाचे भरते आले आहे असे एका युरोपीय अधिकाऱ्याने सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Uks george osborne says will lay out party leadership stance soon