Umar Khalid Documentary IIIT Hyderabad CBFC Objection: तुरुंगात असलेला सामाजिक कार्यकर्ता उमर खालिद याच्यावरील माहितीपटाच्या प्रदर्शनावर सेन्सॉर बोर्डाने (CBFC) तीव्र आक्षेप घेतला आहे. प्रमाणपत्राशिवाय चित्रपटाचे सार्वजनिक प्रदर्शन करणे हे ‘सिनेमॅटोग्राफ कायद्या’चे उल्लंघन ठरेल, असा इशारा सेन्सॉर बोर्डाने दिल्यानंतर ‘ट्रिपल आयटी हैदराबाद’मधील हा शो रद्द केला आहे.
दिग्दर्शक ललित वचानी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘प्रिझनर नंबर ६२६७१० इज प्रेझेंट’ या माहितीपटाचे आयोजन विद्यार्थ्यांच्या एका गटाने केले होते. संस्थेच्या केआरबी सभागृहात शुक्रवारी रात्री ८ वाजता हा शो दाखवण्यात येणार होता. द इंडियन एक्सप्रेसने यासंबंधीचे सविस्तर वृत्त दिले आहे.
सेन्सॉर बोर्डाचा इशारा
या नियोजित प्रदर्शनावर आक्षेप घेत सेन्सॉर बोर्डाने ‘एक्स’वर पोस्ट केली आहे. “कायद्यानुसार विशेष सूट मिळवलेली नसल्यास, सीबीएफसीचे प्रमाणपत्र नसलेल्या कोणत्याही माहितीपटाचे सार्वजनिक प्रदर्शन करणे हे सिनेमॅटोग्राफ कायद्याचे उल्लंघन ठरते,” असे स्पष्ट करत सेन्सॉर बोर्डाने आयआयआयटी हैदराबाद प्रशासनाला टॅग करून आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
सूत्रांच्या हवाल्याने ‘पीटीआय’ने दिलेल्या माहितीनुसार, बोर्डाच्या भूमिकेनंतर विद्यार्थ्यांनी हा शो रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
नेमके कारण काय?
या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत नमूद केल्यानुसार, ‘राजकीय कैदी दिना’चे औचित्य साधून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच भगतसिंग यांचे सहकारी जतींद्र नाथ दास यांच्या स्मृतिदिनाचाही यात संदर्भ देण्यात आला होता. दास यांचे १९२९ मध्ये लाहोर तुरुंगात प्रदीर्घ उपोषणानंतर निधन झाले होते.
बंगळुरूतही झाला होता विरोध
दरम्यान, याआधी बंगळुरू येथील ‘नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी’मध्येही या माहितीपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या प्रदर्शनाला तीव्र विरोध केला होता. शैक्षणिक संकुलाचा वापर राजकीय प्रचारासाठी केला जात असल्याचा आरोप ‘अभाविप’ने केला होता. त्यानंतर विद्यार्थी समितीने “सुरक्षा आणि नियोजनाची कारणे” पुढे करत हे प्रदर्शन पुढे ढकलले होते.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा माजी विद्यार्थी असलेला उमर खालिद सध्या ईशान्य दिल्लीतील दंगलीच्या कथित षड्यंत्रप्रकरणी अटकेत आहे. दिल्ली पोलिसांनी सप्टेंबर २०२० मध्ये त्याच्याविरोधात ‘युएपीए’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून तो तुरुंगात आहे.
