तेहलकाचा माजी संपादक तरुण तेजपाल याला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर तरुण तेजपालची प्रतिक्रिया समोर आली आहे. तरुण तेजपालने २०१३ मध्ये त्याच्या कनिष्ठ महिला सहकाऱ्यावर बलात्कार केला होता. या प्रकरणात पीडित महिलेने गोवा पोलिसांत तक्रार दाखल केली होती. हे प्रकरण मागील १३ वर्षांपासून सुरु होतं. या प्रकरणी २०२१ मध्ये तरुण तेजपालची मुंबई सत्र न्यायालयाने मुक्तताही केली होती. पण गोवा सरकारने हे प्रकरण लावून धरलं ज्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द करत तरुण तेजपालला दोषी ठरवलं आणि त्याला शिक्षा सुनावली. ज्यानंतर तरुण तेजपालची प्रतिक्रिया समोर आली आहे.
१० वर्षांची शिक्षा सुनावली गेल्यानंतर तरुण तेजपालने काय म्हटलंय?
गोवा सरकारमधले लोक मागील १३ वर्षांपासून माझ्यावर सूड उगवू इच्छितात. त्यामुळेच आज हा निर्णय आला आहे. मला खात्री आहे की असेही न्यायाधीश येतील जे सत्य पाहू शकतील. आम्ही सगळे पुरावे सार्वजनिक करु. मी या प्रकरणात निष्पाप आहे, माझ्याकडे त्यांनी जे पुरावे सादर केले त्यापेक्षा दहा पट जास्त पुरावे आहेत. मला खरंतर निर्दोषच ठरवलं गेलं पाहिजे होतं. पण माझ्यावर सूड उगवला गेला आहे असं तरुण तेजपालने माध्यमांना सांगितलं. तसंच तरुण तेजपालने असंही म्हटलं आहे की २०२० मध्ये दिल्लीत जो हिंसाचार झाला त्यानंतर ज्याप्रमाणे शर्जिल इमाम आणि उमर खालिद यांना तुरुंगात धाडण्यात आलं आहे तसंच मलाही धाडण्यात आलं आहे. मी देखील त्यांच्यापैकीच एक आहे असंही तरुण तेजपालने म्हटलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या या निर्णयाला आम्ही आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहोत. तेहलकाने अनेकांची पोलखोल केली होती. त्यामुळे मला राजकीय बळी दिला जातो आहे. आम्ही साडेसात वर्षे खटला लढवला ज्यानंतर माझी निर्दोष मुक्तताही करण्यात आली होती. आता शर्जिल इमाम, उमर खालिद, भीमा कोरेगाव प्रकरणातील सुरेंद्र गडलिंग यांच्यासारखंच मलाही तुरुंगात धाडलं जाईल, मी देखील त्यांच्यापैकीच एक असेन असंही तरुण तेजपालने स्पष्ट केलं.
बलात्काराचं प्रकरण नेमकं काय?
प्रकरण नोव्हेंबर २०१३ मध्ये गोव्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित ‘थिंकफेस्ट’ कार्यक्रमादरम्यान घडले होते. तरुण तेजपालने त्याच्यासह काम करणाऱ्या एका माजी कनिष्ठ महिला सहकाऱ्याचं लैंगिक शोषण केलं असा आरोप तिने केला होता. या महिलेने असा आरोप केला होता की, हॉटेलच्या लिफ्टमध्ये तेजपाल यांनी तिचे लैंगिक शोषण केले. या प्रकरणी ३० नोव्हेंबर २०१३ या दिवशी तरुण तेजपालला अटक करण्यात आली होती. त्याआधी त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, परंतु न्यायालयाने तो फेटाळला होता. सुमारे साडेसात वर्षांनंतर, २०२१ मध्ये गोव्याच्या सत्र न्यायालयाने पुराव्या अभावाचे कारण देत तेजपाल यांची निर्दोष मुक्तता केली होती. या निर्णयाविरुद्ध गोवा सरकारने हायकोर्टात अपील केले होते. आता गोवा खंडपीठाने तो निर्णय रद्द करत तरुण तेजपालला दोषी ठरवलं, तसंच त्याला आता या प्रकरणात १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
