गेल्या दोन महिन्यांपासून अफगाणिस्तानमध्ये तालिबानची राजवट आहे. मात्र, अजूनही तालिबानच्या अधिपत्याखाली असलेल्या अफगाणिस्तान सरकारला जागतिक स्तरावर मान्यता मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर तालिबानी सरकारच्या शिष्टमंडळाने पहिल्यांदाच अमेरिकन सरकारशी प्रत्यक्ष चर्चा केल्यानंतर त्यावर संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अँटोनियो गुटेरस यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. अफगाणिस्तानमधल्या परिस्थितीवर भाष्य करताना गुटेरस यांनी तालिबान्यांना स्पष्ट शब्दांत सुनावलं आहे. तसेच, इतर देशांनी अफगाणिस्तानच्या अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी हातभार लावणं आवश्यक असल्याचं देखील त्यांनी नमदू केलं आहे.

अँटोनियो गुटेरस यांनी सोमवारी संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीमध्ये अफगाणिस्तानमधील परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली. विशेषत: अमेरिकेसोबत तालिबानी सरकारच्या शिष्टमंडळाच्या पहिल्या भेटीमध्ये अफगाणिस्तानमधील महिला आणि मुलींच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त करण्यात आल्यानंतर या मुद्द्यावर गुटेरस यांनी तालिबानला स्पष्ट शब्दांत सुनावलं आहे. “मला अफगाणिस्तानमधील महिला आणि मुलींची जास्त चिंता वाटते आहे. तालिबानींनी या दोन्ही गटांना दिलेली आश्वासनं पूर्ण केलेली नाहीत. त्यांनी दिलेलं वचन मोडलं आहे”, असं गुटेरस म्हणाले आहेत.

तालिबान्यांना आवाहन

“माझं तालिबानी सरकारला कळकळीचं आवाहन आहे की त्यांनी अफगाणिस्तानमधील महिला आणि मुलींना दिलेलं आश्वासन पाळावं, पूर्ण करावं. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आणि संबंधित कायद्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात”, अशी भूमिका गुटेरस यांनी मांडली आहे.

तालिबानने दिलेली आश्वासनं मोडल्यामुळे…

दरम्यान, तालिबानी सरकारने अफगाणिस्तानमधील महिलांना दिलेली आश्वासने मोडल्यामुळे त्याचे त्यांच्यावर परिणाम होत असल्याचं गुटेरस यांनी नमूद केलं. “मोडलेल्या आश्वासनांचा परिणाम अफगाणिस्तानमधील महिला आणि मुलींची स्वप्न मोडण्यामध्ये होत आहे. २००१ पासून अफगाणिस्तानमध्ये ३० लाख मुलींनी शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. पण या काळात मुलींनी शिक्षण घेण्याचं प्रमाण फक्त ६ वर्षांपासून १० वर्षांपर्यंतच वाढू शकलेलं आहे”, असं ते म्हणाले.