सीरियामध्ये रासायनिक शस्त्रांच्या हल्ल्यांना बाशर अल-असाद यांची राजवट जबाबदार असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले असल्याचे अमेरिकेने मंगळवारी जाहीर केले.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालातील माहितीमध्ये म्हटले आहे की, भूपृष्ठावरून भूपृष्ठावर मारा करणारी रासायनिक रॉकेट ही केवळ असाद यांच्या राजवटीकडेच उपलब्ध होती आणि त्यामुळेच त्यांची राजवट या हल्ल्यांना जबाबदार असल्याचे स्पष्ट होते, असे व्हाइट हाऊसचे प्रवक्ते जे कार्ने यांनी म्हटले आहे.
सीरियामध्ये रासायनिक शस्त्रांचा वापर करण्यात आल्याचे स्पष्ट पुरावे मिळाले असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे, असे संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बान की मून यांनी सुरक्षा परिषदेला सांगितल्यानंतर अमेरिकेने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
घौटामध्ये सरिन वायूचा वापर करण्यात आल्याचे ठोस पुरावे आपल्याकडे असून गेल्या ३ महिन्यांपासून सुरू असलेल्या धुमश्चक्रीत रासायनिक शस्त्रांचा मोठय़ा प्रमाणावर वापर करण्यात आला, असे संयुक्त राष्ट्रसंघाच्या तपास पथकाने आपल्या अहवालात म्हटले आहे. सीरियाची रासायनिक शस्त्रे एका वर्षांत नष्ट करण्याचे रशिया आणि अमेरिकेने मान्य केल्यानंतर दोन दिवसांनी सुरक्षा परिषदेची बैठक घेण्यात आली.