scorecardresearch

फिरणारी झुरळं, तुटलेली खुर्ची आणि…एअर इंडियाच्या विमानातले फोटो व्हायरल; UN अधिकाऱ्याच्या ट्वीटवर कंपनीची दिलगिरी!

एअर इंडियाच्या विमानातून झुरळांचा प्रवास! थेट संयुक्त राष्ट्राच्या पदाधिकाऱ्यानं नाराजी व्यक्त केल्यानंतर कंपनीकडून दिलगिरी!

cockroaches in air india flight
एअर इंडियाच्या विमानात फिरणारी झुरळं, तुटलेल्या खुर्च्या, बिघडलेली उपकरणं! (फोटो – ट्विटरवरून साभार)

विमान प्रवास म्हणजे आरामदायी, सर्व सुखसोयींनी समृद्ध आणि प्रवासाचा पूर्ण आनंद देणारा अशी साधारणपणे समजूत असते. वास्तवातही तशीच परिस्थिती असते असं मानायलाही हरकत नाही. मात्र, काही प्रसंगी या समजुतीला मोठमोठाले तडे जाताना दिसतात. संयुक्त राष्ट्र अर्थात UN च्या एका राजनैतिक अधिकाऱ्याला नुकताच एअर इंडियाच्या विमानाचा आलेला अनुभव त्याच्या या समजुतीला असाच तडा देणारा ठरला. कारण आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या या अधिकाऱ्याला एअर इंडियाच्या विमानात दिसली झुरळं, तुटलेल्या खुर्च्या, मनोरंजनाची बिघडलेली साधनं आणि बरंच काही! गेल्या आठवड्यात या अधिकाऱ्यानं याचे फोटो आणि आपली व्यथा ट्वीट केली होती. हे फोटो आता व्हायरल होऊ लागले आहेत.

नेमकं झालं काय?

यूएनचे राजनैतिक अधिकारी गुरप्रीत हे गेल्या आठवड्यात एअर इंडियाच्या न्यूयॉर्क ते दिल्ली फ्लाईटने प्रवास करत होते. पण विमानात मन प्रसन्न करणाऱ्या स्वच्छतेऐवजी जिवंत फिरणारी झुरळं त्यांना खुर्चीवर दिसली. तसेच, खुर्चीचं हँडल तुटलेल्या अवस्थेत सापडलं. विमानात मनोरंजनासाठी उपलब्ध करून दिलेली त्यांच्या खुर्चीजवळची कोणतीही उपकरणं चालू नव्हती. त्याामुळे संताप्त झालेल्या गुरप्रीत यांनी थेट ट्वीटरवर यासंदर्भात पोस्ट लिहिली.

१२ मार्च रोजी गुरप्रीत यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली. “संयुक्त राष्ट्राचा एक अधिकारी म्हणून मी जगभर विमान प्रवास केला आहे. पण एअर इंडिया १०२ जेएफके ते दिल्ली हा माझ्या आत्तापर्यंतचा सर्वात वाईट विमान प्रवास अनुभव होता. तुटलेल्या खुर्च्या, मनोरंजनाची बिघडलेली उपरकरणं, रीडिंग लाईटही बिघडलेली आणि झुरळं! ग्राहकांच्या सेवेकडे अक्षम्य दुर्लक्ष”, असं ट्वीट त्यांनी केलं.

दरम्यान, एअर इंडियाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. “माननीय महोदय, तुम्हाला आमच्या विमानात आलेल्या वाईट अनुभवासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. विमानसेवेबद्दल ऐकण्यासाठी हे अजिबात चांगलं नाही. कृपया तुम्ही तुमचे बुकिंग डिटेल्स आम्हाला द्यावेत. आम्ही संबंधितांना यासंदर्भात आढावा घेण्यास सांगू”, असं ट्वीट एअर इंडियाकडून करण्यात आलं आहे.

या प्रकाराचे फोटो सध्या व्हायरल होत असून त्यावर नेटिझन्सकडूनही आपापले अनुभव शेअर केले जात आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-03-2023 at 11:19 IST

संबंधित बातम्या