युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशिया संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगातून बाहेर झाला आहे. संयुक्त राष्ट्र महासभेने रशियाला मानवाधिकार परिषदेतून निलंबित केले आहे. रशियाला आयोगातून वगळण्याच्या मसुद्यावर आज (गुरुवार) मतदान झाले. या मतदानास भारताची अनुपस्थिती होती. या प्रस्तावाच्या समर्थनार्थ ९३ सदस्यांनी मतदान केले आणि २४ जणांनी विरोधात मतदान केले. तर, ५७ सदस्य देश मतदानापासून दूर राहिले.

संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉमस-ग्रीनफिल्ड यांनी मंगळवारी मानवाधिकार परिषदेसमोर रशियाला निलंबित करण्याचे आवाहन केले होते. त्यावर आज मतदान झाले. मानवाधिकार परिषदेतून रशियाला काढून टाकण्याच्या बाजूने दोन तृतीयांश मतदान झाले.

युक्रेनच्या बुचा येथील हत्येचा निषेध करत भारताने ठरावावर मतदान करणे टाळले आणि स्वतंत्र तपासाच्या आवाहनाला पाठिंबा दिला. बुचा येथे शेकडो नागरिक रस्त्यावर मृतावस्थेत आढळले. यावरून युक्रेनने रशियावर बुचा हत्याकांडाचा आरोप केला होता. मात्र, रशियाने हे आरोप फेटाळले असून हा युक्रेनचा अपप्रचार असल्याचे म्हटले आहे.

ब्रिटन, युनायटेड स्टेट्स, कॅनडा आणि युरोपियन युनियनसह अनेक देशांनी युक्रेनमधील रशियाच्या लष्करी कारवायांचा निषेध केला आहे आणि मॉस्कोवर निर्बंध लादले आहेत. रशियाशी लढण्यासाठी युक्रेनला लष्करी मदत करण्याचे आश्वासनही या देशांनी दिले आहे.