राजधानी दिल्लीत शनिवारी आयोजित कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान आणि त्यापूर्वी पोलीस यंत्रणेकडून अनेक आंदोलकांना ताब्यात घेण्याच्या कारवाईची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार संघटनेने या घडामोडींवर अधिकृत निवेदन प्रसिद्ध करत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. शांततापूर्ण मार्गाने निदर्शने करण्याचा अधिकार अबाधित राखण्यात यावा, असे सांगत बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेल्या सर्व आंदोलकांची बिनशर्त सुटका करण्याचे आवाहन युएनने भारत सरकारला केले आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाचे नेमके वक्तव्य काय?

संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार परिषदेचे प्रवक्ते थामीन अल-खैतान यांनी “भारत: निदर्शनांपूर्वी आणि आंदोलनादरम्यान झालेल्या व्यापक अटकेबाबत चिंता” या शीर्षकाने एक अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले आहे. यात त्यांनी नमूद केले की, दिल्लीत पार पडलेल्या मोठ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलक, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक संघटनांचे प्रतिनिधी, वकील आणि पत्रकारांना ज्या प्रकारे ताब्यात घेण्यात आले, ही अत्यंत चिंतेची बाब आहे.

“शांततापूर्ण मार्गाने एकत्र येण्याच्या आणि विरोध दर्शवण्याच्या अधिकाराचा भारताने पूर्ण आदर केला पाहिजे. कोणत्याही आंदोलनावर मर्यादा घालताना ती कायदेशीर चौकटीत, अत्यंत गरजेच्या वेळी आणि योग्य प्रमाणातच असावी.”
— थामीन अल-खैतान, प्रवक्ते, संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद

आंतरराष्ट्रीय नियम आणि लोकशाही परंपरेचे स्मरण

युएनने भारतीय सुरक्षा यंत्रणांना लोकशाही मूल्ये आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार करारांची आठवण करून दिली आहे. आंदोलकांना हाताळताना पोलिसांनी जास्तीत जास्त संयम बाळगावा, अशी आग्रही भूमिका अल-खैतान यांनी मांडली. तसेच, “ज्या व्यक्तींना विनाकारण किंवा बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यात आले आहे, त्यांची कोणतीही अट न ठेवता तात्काळ सुटका करण्यात यावी,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

कारवाईऐवजी ‘सकारात्मक चर्चेचा’ मार्ग स्वीकारावा

फक्त ताब्यात घेण्याच्या कारवाईवरच नव्हे, तर आंदोलकांच्या मागण्यांवरही युएनने भाष्य केले आहे. नागरिकांच्या मनात निर्माण झालेल्या शंका आणि मुद्द्यांचे निरसन करण्यासाठी प्रशासनाने आंदोलक नेत्यांशी अर्थपूर्ण व सकारात्मक संवाद साधावा, असा सल्ला संयुक्त राष्ट्रसंघाने दिला आहे.

नवी दिल्लीत निवडणूक आयुक्तांविरोधातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरक्षेचे कारण देत मोठ्या प्रमाणावर धरपकड केली होती. या कारवाईत सामाजिक कार्यकर्त्यांपासून ते पत्रकारांपर्यंत अनेक जणांना ताब्यात घेण्यात आले. आता थेट संयुक्त राष्ट्रसंघाने या प्रकरणाची दखल घेत हस्तक्षेप केल्यामुळे या मुद्द्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे वळण मिळाले आहे.