काही दिवसांपूर्वीच एक एक्स पोस्ट शेअर करत इराणने अमेरिकेची खिल्ली उडवली होती. अशात आता भारतातील इराण दुतावासाने संयुक्त राष्ट्र संघावर टीका करण्यासाठी बॉलिवूडच्या शोले चित्रपटाचा आधार घेतला आहे. शोले हा भारतातला माइलस्टोन चित्रपट आहे. जगभरात या चित्रपटाचे चाहते आहेत. याच चित्रपटातील संजीव कुमार यांनी साकारलेल्या ‘ठाकूर’ या भूमिकेचा आधार घेत इराणने संयुक्त राष्ट्रसंघाची खिल्ली उडवली आहे.

इराण इन इंडियाने शेअर केलेली पोस्ट काय आहे?

@Iran_in_India ने पोस्ट करत म्हटलं आहे की UN म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजे दहा हात असलेल्या डॉ. स्ट्रेंजप्रमाणे जादूई शक्ती असलेले वगैरे आहे असं त्यांचं पुस्तकांमधलं वर्णन आहे. पण वास्तवात संयुक्त राष्ट्रसंघाची अवस्था ही शोलेतल्या हात कापलेल्या ठाकूरसारखी आहे. यूएनची पुस्तकातली प्रतिमा आणि वास्तवातली प्रतिमा काय हे दाखवण्यासाठी ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. इराणने संयुक्त राष्ट्रसंघाची तुलना शोले सिनेमातल्या ठाकूरशी करून एक्स पोस्टद्वारे त्यांची खिल्ली उडवली आहे. या पोस्टमध्ये दोन फोटो दाखवण्यात आले आहेत. पहिल्या फोटोत डॉक्टर स्ट्रेंज दाखवला आहे. जो मार्व्हल सुपर हिरो आणि न्युरो सर्जन आहे. तर दुसऱ्या फोटोत शोले सिनेमातील हात कापलेला ठाकूर बलदेव सिंग दाखवण्यात आला आहे आणि संयुक्त राष्ट्रांची वास्तवाली अवस्था अशीच आहे असं इराणने म्हटलं आहे.

@Iran_in_India या हँडलवरून ही खिल्ली का उडवली गेली आहे? ती एका विशिष्ट वादासंदर्भात, ठरावासंदर्भात नाही. पण डॉ. स्ट्रेंजसारखी प्रतिमा यातून असं ध्वनित करायचं आहे की संयुक्त राष्ट्रसंघ एका वेळी अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे असं दाखवणं आहे. पण या पोस्टमध्ये असं म्हटलं गेलं आहे की संयुक्त राष्ट्रसंघ आणि त्यांच्याकडे असलेले अधिकार हे पुस्तकात वाचण्यासाठी, वर्णन म्हणून ठीक आहे. पण प्रत्यक्षात त्यांची अवस्था शोले चित्रपटातील ठाकूर बलदेव यांच्यासारखी आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आम्ही इराणला उद्ध्वस्त करू शकतो म्हणत एक इशारा दिला होता. जर इराणने करार केला नाही तर आमच्याकडे हा पर्याय असेल असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं. २२ सप्टेंबरच्या दिवशी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत केलेल्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांनी हा इशारा दिला ज्यानंतर इराणने अमेरिकेची आणि डोनाल्ड ट्रम्प यांची साऊथ इंडियन चित्रपटातला एक व्हिडीओ पोस्ट करत खिल्ली उडवली होती. त्यापाठोपाठ आता इराणने संयुक्त राष्ट्रसंघाची म्हणजेच UN ची खिल्ली उडवली आहे.