दिल्लीत संसद मोर्चादरम्यान झालेला हिंसाचार अवघ्या देशाने पाहिला. कॉक्रोच जनता पार्टीने नियोजित केलेल्या या मोर्चाला देशभरातून हजारो विद्यार्थी आले होते. नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी हे विद्यार्थी एकत्र जमले होते. मात्र, त्यांच्यावर दिल्ली पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आला. यामध्ये अनेक आंदोलक गंभीर जखमी झाले. या घटनेचा देशभरातून निषेध नोंदवण्यात येतो आहे. लोकसभेत सोमवारीही याचे पडसाद उमटले. आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे अशी मागणी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अजून साधी माफीही मागितलेली नाही-राहुल गांधी
लोकसभेच्या अध्यक्षांना चर्चेसाठी सरकारकडून संमती घ्यावी लागते आहे. हे त्यांनीच आम्हाला सांगितलं आहे. सध्या देशातला महत्त्वाचा प्रश्न आहे तो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा. मात्र जे काही चाललं आहे ते चांगलं नाही. विद्यार्थ्यांना मारहाण केली जाते आहे. भारताच्या धोरणाच्या विरोधात ही बाब आहे. शिवाय याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी घडलेल्या प्रकाराबाबत साधी दिलगिरीही व्यक्त केलेली नाही. जे आपल्या देशातले तरुण आहेत ते शिक्षण धोरणाबाबत, परीक्षांच्या धोरणांबाबत आंदोलन करत आहेत. संपूर्ण देशाला माहीत आहे की ही दोन्ही धोरणांबाबत आपली अनास्था आहे. सगळ्या व्यवस्था पोकळ झाल्या आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का बसले आहेत? पोलिसांकडून जो बळाचा वापर झाला आणि जे काही आजही चाललं आहे त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागितली पाहिजे. अशी मागणी राहुल गांधींनी केली. लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
विद्यार्थ्यांना त्यांचं भवितव्य अंधारात दिसतं आहे-राहुल गांधी
राहुल गांधी पुढे म्हणाले, तरुणांना वागवण्याची ही पद्धत नाही. त्यांच्यासाठी सगळे दरवाजे बंद झाले आहेत. त्यांना आज कुठलीही संधी नाही. त्यांच्याकडे फक्त परीक्षा देण्याचा मार्ग आहे. मात्र परीक्षांचे पेपरही फुटत आहेत आणि त्यामुळेच हे विद्यार्थी सरकारला प्रश्न विचारत आहेत. कारण सरकारची परीक्षा घेणारी यंत्रणा पोकळ झाली आहे. या विद्यार्थ्यांना त्यांच्या भवितव्याची चिंता आहे. अदाणी, अंबानी यांच्यासह संघाने संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचा ताबा घेतला आहे. संघाचे प्रचारक असलेले लोक विद्यापीठांचे कुलगुरु होत आहेत. त्यामुळे आम्हाला आमचं भवितव्य अंधारात दिसतं आहे असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच ते सरकार विरोधात प्रश्न विचारत आहेत. हा फक्त शिक्षण धोरणाचा प्रश्न नाही, बेरोजगारीचा आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. या देशातले विद्यार्थी म्हणत आहेत की आम्हाला भवितव्य नाही, आम्हाला ते हवं आहे. यात काहीही गैर नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत मौन धोरण केलं आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे.पण जे काही सोमवारी घडलं ते गृहमंत्र्यांच्या आदेशाने घडलं आहे शिवाय जे काही घडलं त्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींना कल्पना होती. त्यामुळे आमची तर मागणी आहे की देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांनी राजीनामा दिला पाहिजे.
