वृत्तसंस्था, इस्लामाबाद

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने गुरुवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे सर्व निकाल अद्यापही जाहीर केलेले नाहीत. मात्र ‘पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ’चे (पीटीआय) नेते आणि माजी पंतप्रधान इम्रान खान आणि तीनवेळा पंतप्रधानपदी राहिलेले ‘पाकिस्तान मुस्लीम लीग’चे (नवाज गट) नेते नवाज शरीफ या दोघांनीही आपापला विजय जाहीर केला आहे.

शनिवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत २६५पैकी २५५ जागांवरील निकाल जाहीर करण्यात आले. त्यामध्ये तब्बल १०० अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. त्यापैकी इम्रान खान यांच्या ‘पीटीआय’ने समर्थन दिलेले ९० उमेदवार आहेत. तर नवाज शरीफ यांच्या ‘पीएमएलएन’ला ७२ जागांवर विजय मिळवता आला. ‘पीटीआय’चे निवडणूक चिन्ह गोठवण्यात आल्यामुळे त्यांच्या उमेदवारांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची वेळ आली होती.

हेही वाचा >>>हरियाणा सरकारला शेतकरी मोर्चाची धास्ती? तीन दिवस इंटरनेट सेवा राहणार बंद; राज्याच्या सीमेवरही कडेकोट बंदोबस्त!

आपण सरकार स्थापनेचा प्रयत्न करत आहोत असे ‘पीटीआय’ने शनिवारी स्पष्ट केले. जनतेच्या निर्णयाचा सर्वानी आदर करावा असे आवाहनही पक्षातर्फे करण्यात आले. निवडणूक आयोगाने शनिवारी निकाल जाहीर केले नाहीत तर रविवारी देशभरात सरकारी कार्यालयांबाहेर शांततापूर्ण निदर्शने करणार असल्याचे ‘पीटीआय’ने पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. दुसरीकडे, नवाज शरीफ यांनीही आघाडी सरकार स्थापन करणार असल्याचे सांगितले. ते ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’बरोबर (पीपीपी) आघाडी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले जात आहे. ‘पीपीपी’ला ५३ जागांवर विजय मिळाला आहे.

गुरुवारी मतदान होण्यापूर्वी पाकिस्तानात मोठय़ा प्रमाणात हिंसाचार झाला. विशेषत: बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतामध्ये हिंसेत जीवितहानी झाली. दरम्यान, या निवडणुकीत कोणतेही गैरप्रकार झाले नसल्याचा दावा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे.

(पाकिस्तानात इम्रान खान यांच्या ‘पीटीआय’ने निवडणूक चिन्ह गमावल्यानंतरही त्यांचे सर्वाधिक ९० उमेदवार विजयी झाले.)

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uncertainty of election results in pakistan claims of victory by imran khan nawaz sharif amy
First published on: 11-02-2024 at 02:27 IST