Building Collapses: बंगळुरूमध्ये मुसळधार पाऊस पडत असताना एक मोठी दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. बंगळुरू पूर्व येथे हन्नूर येथे एक निर्माणाधीन इमारत कोसळली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची शक्यता वर्तविली जात आहे. नुकत्याच आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत १३ जणांना ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढले गेले आहे. तर आणखी सात लोक बेपत्ता आहेत. ज्यांची सुटका केली, त्यापैकी पाच लोक गंभीर जखमी असल्याचे सांगितले जाते. दरम्यान या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

मंगळवारी (२२ ऑक्टोबर) सायंकाळी इमारत कोसळल्यानंतर अग्निशमन दल आणि आपत्कालीन विभागाने बचाव कार्य सुरू केले. पोलीस तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे. या इमारतीला टाईल्सचा पुरवठा करणाऱ्या अहमदने सांगितले की, इमारतीमध्ये टाईल्स, काँक्रिट आणि प्लम्बिगचे काम करणारे जवळपास २० कामगार आहेत. अहदमने आरोप केला की, इमारतीचा पाया कच्चा होता, ज्यामुळे इमारत अचानक कोसळली.

पोलीस उपायुक्त डी. देवराज यांनी बुधवारी सांगितले की, एकूण १३ लोक ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहेत. तर मृत्यू झालेल्यांची ओळख पटविण्यात आली आहे. अरमान (२६), त्रिपाल (३५), मोहम्मद साहिल (१९) , सत्य राजू (२५) आणि शंकर अशा पाच जणांचा मृतदेह बाहेर काढला गेला आहे. अरमान, त्रिपाल आणि साहिल बिहारमधून आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Deputy Chief Minister and Bengaluru Development Minister D K Shivakumar
उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि बंगळुरू विकास मंत्री डीके शिवकुमार यांनी मंगळवारी रात्री दुर्घटना स्थळाला भेट दिली. त्यांनी सांगितले की, बृहत बंगळुरू महानगरपालिकेने संबंधित बांधकाम व्यावसायिकाला नोटीस बजावली आहे. तसेच त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. बचाव कार्य संपल्यानंतर आम्ही कारवाईला सुरुवात करू. तसेच महसूल विभागाला सूचना देऊन अशाप्रकारच्या कुचकामी बांधकामाला परवानगी देऊ नये, असे आदेश दिले जाणार आहेत.

Story img Loader