अंडरवर्ल्ड डॉन आणि १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्रधार दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानमध्येच असल्याचे सूचक विधान पाकचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी केले आहे. दाऊद इब्राहिम कराचीत असेल किंवा अन्य कुठे. पण आम्ही यात भारताला मदत का करावी असे मुशर्रफ यांनी म्हटले आहे.
दाऊद इब्राहीम हा पाकिस्तानमध्ये लपून बसला असला तरी पाकने हा दावा नेहमीच फेटाळून लावला आहे. मात्र माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये दाऊदविषयी भाष्य केले. मुशर्रफ म्हणाले, भारताने नेहमीच पाकिस्तानवर आरोप केला आहे. पण आम्ही त्यांना दाऊदला पकडून देण्याचे सौजन्य का दाखवावं?. दाऊद कराचीत असेल किंवा अन्य कुठे, भारतात मुस्लिमांची हत्या होते आणि यावर दाऊद प्रत्युत्तर देतो असे सांगत मुशर्रफ यांनी अप्रत्यक्षपणे दाऊदचे समर्थन केले.




ओसामा बिन लादेनच्या वेळीही पाकिस्तानने दावा फेटाळला होता. मात्र पाकमधील अबोटाबादमध्ये तो लपून बसला होता हे अमेरिकेच्या कारवाईनंतर स्पष्ट झाले. याकडे मुशर्रफ यांचे लक्ष वेधण्यात आले असता ते म्हणाले, गुप्तचर यंत्रणेला ओसामा बिन लादेनविषयी माहिती नव्हती. अबोटाबादमध्ये राहणारा व्यक्ती ओसामा होता याची माहिती कोणालाही नव्हती. तो अमली पदार्थाची तस्करी करणारा व्यक्ती असावा असे स्थानिकांना वाटत होते असे मुशर्रफ यांनी नमूद केले. ओसामा अबोटाबादमध्ये पाच वर्षांपासून राहत होता या दाव्यावर मलादेखील शंका असल्याचे त्यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी ब्रिटन सरकारने आर्थिक निर्बंध घातलेल्यांची यादी जारी केली होती. यात दाऊदचही समावेश होता. त्याची सर्व खाती आणि मालमत्ता गोठवण्यात आली होती. यात दाऊदची २१ बोगस नावेही जाहीर करण्यात आली होती. दाऊदच्या कराचीमधील घरांचा पत्तादेखील यादीत जाहीर करण्यात आला होता.