न्यू यॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत (UNGA) पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकत २०२५ मधील ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यानच्या लष्करी संघर्षावर स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या या दाव्यांमधील फोलपणा सिद्ध करण्यासाठी भारतीय मुत्सद्याचे एक उपरोधिक हास्यच पुरेसे ठरले. संयुक्त राष्ट्रांच्या सभागृहात कॅमेऱ्यात टिपला गेलेला हा क्षण सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या संदर्भातील वृत्त ‘इंडिया टूडे’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.

नेमकं काय घडलं संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत?

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करताना शाहबाज शरीफ यांनी आपल्या भाषणात पाकिस्तानच्या लष्कराचे कौतुक केले. ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान भारताच्या कारवाईला उत्तर देताना पाकिस्तानी सैन्याने “अत्यंत अचूक आणि व्यावसायिक वृत्तीने” प्रत्युत्तर दिल्याचा दावाही त्यांनी केला.

“आमच्या सैन्याने शत्रूची बोलती बंद केली, त्यांचा हल्ला परतवून लावला आणि त्यांना कधीही न विसरता येणारा धडा शिकवला,” असा बनाव रचत शरीफ यांनी या संघर्षात पाकिस्तानचा विजय झाल्याचे चित्र उभे करण्याचा प्रयत्न केला.

भारतीय राजदूताच्या एका हास्याने मारली बाजी

शाहबाज शरीफ मंचावरून पाकिस्तानाच्या ‘विजयाचा’ काल्पनिक पाढा वाचत असतानाच सभागृहातील कॅमेरा भारतीय शिष्टमंडळाचे सदस्य आर. श्रीनिवास यांच्याकडे वळला.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे दावे ऐकून आर. श्रीनिवास यांनी मान हलवत एक उपरोधिक स्मितहास्य केले. पाकिस्तानचा हा दावा भारत किती क्षुल्लक आणि बिनबुडाचा मानतो, हे सांगण्यासाठी श्रीनिवास यांची ही एकच प्रतिक्रिया पुरेशी ठरली. सोशल मीडियावर या क्षणाचा व्हिडिओ येताच तो अल्पावधीतच तुफान व्हायरल झाला आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’ची पार्श्वभूमी

भारताने गतवर्षी ७ मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी पायाभूत सुविधांवर जोरदार हल्ला चढवत ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले होते. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा जीव गेला होता, या काळ्या कृत्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने ही धडक कारवाई केली होती.

ट्रम्प यांच्या मध्यस्थीच्या दाव्यावरूनही वाद

आपल्या भाषणात शरीफ यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या “दृढ आणि कणखर नेतृत्वाचे” आभार मानले. ट्रम्प यांच्या “वेळेवर केलेल्या मध्यस्थीमुळेच” दक्षिण आशियातील लाखो लोकांचे प्राण वाचले आणि दोन्ही देशांमधील युद्धविराम शक्य झाला, असा दावा शरीफ यांनी केला.

अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही आपण भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवल्याचा पुनरुच्चार केला असला, तरी भारताने मात्र कोणत्याही तिसऱ्या देशाची मध्यस्थी पूर्णपणे फेटाळून लावली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील सर्व मुद्दे द्विपक्षीय असून त्यात कोणत्याही तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप मान्य नाही, ही भारताची भूमिका ठाम आहे.