शेतकरी संघटना दबावाखाली; निहंग गटावर संशय;

नवी दिल्ली : सुमारे वर्षभर शेतकरी आंदोलनाचे प्रमुख ठिकाण बनलेल्या सिंघू सीमेवर शुक्रवारी एका व्यक्तीची अत्यंत क्रूरपणे हत्या झाली. या हत्येमागे निहंग शिखांचा गट जबाबदार असल्याचा संशय व्यक्त असून या गटातील व्यक्ती सातत्याने आंदोलनस्थळी वावरत असल्याने शेतकरी संघटनांवरही दबाब वाढू लागला आहे. या हत्येचा संयुक्त किसान मोर्चातील नेत्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला असून निहंग गटाचा आंदोलनाशी कोणताही संबंध नसल्याचे शुक्रवारी स्पष्ट केले.

 आंदोलनस्थळी शुक्रवारी पहाटे पाच वाजता लखबीर सिंग ही व्यक्ती पोलिसांना मृत अवस्थेत सापडली. या व्यक्तीचा एक हात दोरखंडांनी बांधला होता, दुसरा हात मनगटापासून कापण्यात आला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लखबीर सिंगभोवती उभ्या राहिलेल्या निहंग गटातील काही व्यक्ती त्याला जाब विचारत असल्याच्या चित्रफिती पोलिसांना मिळाल्या. या फितींच्या आधारे ही हत्या निहंग गटाने केल्याचा दावा पोलिसांनी केला. ‘गुरु ग्रंथ साहिब’ची प्रत उचलून पळ काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला आम्ही पकडले. त्याला सिंघू सीमेवर कोणी पाठवले याची विचारणाही केली. त्यानंतर आम्ही त्याचे पाय मोडले आणि हात कापून टाकला. मग त्याला बांधून ठेवले. ज्याने या व्यक्तीला पाठवले त्यालाही आम्ही ठार मारू, असे निहंग गटातील व्यक्ती सांगत असल्याची चित्रफीतही पोलिसांनी जप्त केली. मृत लखबीर सिंग कामगार असून त्याचे वडील माजी सैनिक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

‘पंजाबमधील तरणतारण जिल्ह्य़ातील लखबीर सिंग याच्या हत्येची जबाबदारी घटनास्थळावरील निहंग गटाने घेतली आहे. मृत व्यक्ती तसेच निहंग गटाशी संयुक्त किसान मोर्चाचा काहीही संबंध नाही. कोणत्याही धार्मिक ग्रंथाचा अपमान करणे योग्य नाही हीच मोर्चाची भूमिका आहे. पण कोणालाही कायद्याचे उल्लंघन करण्याचा अधिकार नाही. धर्मग्रंथाचा अपमान आणि झालेली हत्या या दोघांमागील षड्यंत्राचा कसून तपास झाला पाहिजे व कटातील दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. यासंदर्भात होणाऱ्या कोणत्याही कायदेशीर चौकशीसाठी पोलीस व स्थानिक प्रशासनाला मोर्चा सहकार्य करेल,’ असे संयुक्त किसान मोर्चाने निवेदनात स्पष्ट केले.

घडले काय?

सिंघू सीमेवर पहाटे पाचच्या सुमारास शेतकरी आंदोलनस्थळानजीक लखबीर सिंग (३५) नामक व्यक्तीचा देह छिन्न-विछिन्न अवस्थेत आढळला. गेल्या काही दिवसांपासून लखबीर आंदोलनस्थळी असलेल्या निहंग गटातील लोकांबरोबर राहात होता. त्याने शिखांचा धर्मग्रंथ ‘गुरू ग्रंथ साहिब’चा अनादर केल्याबद्दल निहंग शिखांनी त्याची हत्या केल्याचा संशय सोनिपत पोलिसांनी व्यक्त केला. या हिंसक घटनेनंतर संयुक्त किसान मोर्चातील नेत्यांनी तातडीने निवेदन प्रसिद्ध करून या घटनेपासून आंदोलनातील शेतकरी संघटनांना व त्यांच्या मोर्चाला वेगळे केले.

आंदोलनाला धार्मिक वळण..  मोर्चाच्या सुकाणू समितीचे सदस्य योगेंद्र यादव यांनीही दृक्श्राव्य फीत प्रसिद्ध करून हत्येचा निषेध केला व निहंग गटाचा शेतकरी आंदोलनाशी संबंध नसल्याचे जाहीर केले. हे शेतकऱ्यांचे आंदोलन असून धार्मिक नव्हे, तुम्हाला आंदोलनात स्थान नाही, हे शेतकरी नेत्यांनी निहंग गटाला सातत्याने सांगितले आहे. पण तरीही हा गट सिंघू सीमेवर ठिय्या देऊन बसला आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन आत्तापर्यंत शांततेने झाले असून इथे हिंसेला जागा नाही, असे यादव यांनी नमूद केले. शेतकरी आंदोलनाला धार्मिक बनवण्याचा प्रयत्न केला जात असून ही हत्या कट-कारस्थानाचा भाग असल्याचा संशय मोर्चाचे नेते जगजीत सिंग दल्लेवाल यांनी व्यक्त केला. मृत व्यक्तीला ३० हजार रुपये देऊन पाठवण्यात आल्याची कबुली त्याने मृत्यूपूर्वी दिल्याचे सांगितले जाते. मात्र या कथित कबुलीची दृक्श्राव्य फीत नसल्याने पोलिसांनी या संदर्भातही सखोल चौकशी करावी, अशी मागणीही दल्लेवाल यांनी केली.