Shivraj Singh Chouhan call farmer after Video of struggling to save crop in heavy rain goes viral : शेतकऱ्याने बाजारात विक्रीसाठी आणलेला शेतमाल पावसाच्या पाण्यात वाहून जातानाचा एक व्हिडीओ गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ वाशिम जिल्ह्यातील मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घडलेल्या एका घटनेचा होता.
ज्यामध्ये गौरव पंवार नावाचा शेतकरी पावसाच्या पाण्यात वाहून जात असलेल्या भुईमुगाच्या शेंगा वाचण्याची धडपड करताना दिसत होता. अवकाळी पावसात आपल्या कष्टाने पिकवलेल्या शेतमालाचं रक्षण करण्यासाठीचा हा हताश प्रयत्न पाहूण अनेकांनी हळहळ व्यक्त केली होती. तसेच या व्हिडीओमुळे अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या दुर्दशेकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. दरम्यान आता या व्हायरल झालेल्या व्हिडीओची आता केंद्रीय कृषमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दखल घेतली आहे.
शिवराज सिंह चौहान यांनी सोशल मीडियावर याबद्दल एक व्हिडोओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ते या शेतकर्याशी संवाद साधताना दिसत आहेत. या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी याबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी लिहिलं की, “सोशल मीडियावर महाराष्ट्रातील शेतकरी बंधू गौरव पंवार यांचा व्हिडीओ पाहून मन विचलित झालं. अवकाळी पावसाने बाजारात ठेवलेले भुईमुगाचे पीक खराब झालं. शेतकरी असल्याने हे दु:ख मी चांगल्या पद्धतीने समजू शकतो. मी गौरव यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि त्यांना धीर दिला. शेतकर्यांनी चिंता करू नये. लवकरच नुकसानाची भरपाई केली जाईल. महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत संवेदनशील आहेत. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार प्रत्येक परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांना आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे,” असे शिवराज सिंह चौहान म्हणाले आहेत.
सोशल मीडिया पर महाराष्ट्र के किसान भाई श्री गौरव पंवार जी का मार्मिक वीडियो देखकर हृदय विचलित हो गया।
— Office of Shivraj (@OfficeofSSC) May 18, 2025
असमय बारिश ने मंडी में रखी उनकी मूंगफली की फसल को बर्बाद कर दिया। किसान होने के नाते मैं इस पीड़ा को भली प्रकार समझ सकता हूं। मैंने गौरव जी से फोन पर बात की, उन्हें ढांढस… pic.twitter.com/gGn6a3BuMi
या व्हिडीओमध्ये शिवराज सिंग चौहान हे या शेतकर्याला काळजी करू नका, राज्य सरकार खूप संवेदनशील आहे. मुख्यमंत्री आणि कृषीमंत्री हे देखील खूप संवेदनशील आहेत. झालेल्या नुकसानीची भरपाई दिली जाईल असे आश्वासन देताना दिसत आहेत. तसेच त्यांनी यावेळी शेतकऱ्याच्या तब्यतीची चौकशी देखील केली.
तत्काळ मदतीची घोषणा करा – जयंत पाटील
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी देखील या शेतकऱ्याचा व्हिडीओ पोस्ट करत राज्यात झालेल्या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी एक्सवर पोस्ट करत लिहीले होते की, “राज्यात सध्या अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. ठिकठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. अनेक ठिकाणी गारपीट झाली आहे. यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील चार दिवस अवकाळी पाऊस पडणार असल्याचा वेधशाळेने अंदाज वर्तवला आहे. शेतकऱ्यांवर मोठे संकट निर्माण झाले आहे.”
“मुसळधार पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील मानोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्याचा शेतमाल पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. वाहून जाणारा माल भरण्यासाठी शेतकरी जीवाचा आकांत करून प्रयत्न करत होता. राज्यभर दिसणारे हे चित्र केविलवाणे आहे. शेतकऱ्यांच्या या वेदना सरकारला कळतील का? शेतकऱ्यांच्या या अडचणींवर मात करण्यासाठी सरकारने तत्काळ पावलं उचलली पाहिजेत. संपूर्ण राज्यात जिथे अवकाळी पाऊस झाला आहे तिथे सरकारने पंचनामे करून तत्काळ मदतीची घोषणा करायला हवी,” अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली होती.