Chandrayaan 4 Missions : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज (१८ सप्टेंबर) केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यावेळी चांद्रयान मोहिमेबाबतही केंद्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने आता ‘चांद्रयान-४’ या मोहिमेला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली आहे. चांद्रयान-४’ मोहिमेचा विस्तार करण्याच्या पार्श्वभूमावर सरकारने मंजुरी दिली आहे.

मंत्रिमंडळात झालेल्या निर्णयांबाबत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती देताना सांगितलं की, “चांद्रयान-४ मोहिमेचा विस्तार करण्यासाठी आज महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या मोहिमेला आता आणखी काही घटक जोडण्यात येणार आहेत. चंद्रावर मानवयुक्त मोहिमेची पुढील पायरी असणार आहे. या दिशेने सर्व तयारीच्या पार्श्वभूमीवर ‘चांद्रयान-४’ या मोहिमेला मान्यता देण्यात आली आहे. व्हीनस ऑर्बिटर मिशन, गगनयान फॉलो-ऑन आणि भारतीय अंतरिक्ष स्टेशन आणि नेक्स्ट जनरेशन लॉन्च व्हेईकल डेव्हलपमेंटलाही मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितली आहे.

‘चांद्रयान-४’ या मोहिमेसाठी तब्बल एकूण २,१०४.०६ कोटी रुपयांची आवश्यकता असणार असून या निधीला मान्यता देण्यात आल्याचंही अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केलं. अंतराळयानाचा विकास आणि प्रक्षेपणासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) जबाबदार असेल. ही मोहीम आता मान्यता दिल्यानंतर पुढील ३६ महिन्यांत उद्योग आणि शैक्षणिक संस्थांच्या सहभागाने पूर्ण केली जाईल. तसेच यासंबंधीचे सर्व महत्त्वाचे तंत्रज्ञान स्वदेशी पद्धतीने विकसित करण्याची संकल्पना असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. या चांद्रयान-४ च्या मोहिमेत अतिरिक्त घटकांसह विस्तारित करण्यात आले असून आता पुढची पायरी म्हणजे चंद्रावर जाणारी मानव मोहीम असणार असल्याचंही म्हटलं आहे.

चांद्रयान-३ च्या यशानंतर, केंद्र सरकारने चांद्रयान-४ साठी २,१०४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये ३६ महिन्यांच्या मिशन टाइमलाइनसह चंद्र खडक आणि माती पृथ्वीवर आणणे समाविष्ट आहे. या मोहिमेमध्ये प्रत्येकी पाच मॉड्युल असलेले दोन अंतराळयान स्टॅक असणार आहेत. तसेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) चांद्रयान-४ मिशन येत्या ३६ महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा करण्यात आली आहे. दरम्यान, स्टॅक १ चंद्राच्या नमुना संकलनावर लक्ष केंद्रित करेल, तर स्टॅक २ पृथ्वीवर नमुने हस्तांतरण आणि पुनर्प्रवेश हाताळेल.

मोहिमेचे उद्दिष्ट काय?

दरम्यान, या मोहिमेचे उद्दिष्ट चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणे आहे. तसेच तेथील नमुने गोळा करणे आणि पृथ्वीवर परत आणणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट असणार आहे. चांद्रयान ४ मध्ये चंद्राच्या कक्षेत जटिल डॉकिंग आणि अनडॉकिंग ऑपरेशन्सचा समावेश असेल. ज्यामुळे भारताच्या अंतराळ क्षमतांमध्ये लक्षणीय प्रगती होईल. तसेच एप्रिल २०१४ मध्ये इस्रोने चांद्रयान-४ ची योजना आधीच आखली होती. ज्यामध्ये दोन रॉकेट-LVM-३ आणि PSLV-पाठवण्याचा समावेश आहे.