केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी PLI योजना मंजूर; शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा

मोदी सरकारने वस्त्रोद्योग क्षेत्राला दिलासा दिला आणि शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणाही केली आहे.

Union Cabinet approves PLI scheme for textile sector

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत मंत्रिमंडळात घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. सरकारने वस्त्रोद्योग क्षेत्राला दिलासा दिला आणि शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणाही केली आहे.

वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह (पीएलआय) योजना जाहीर करण्यात आली आहे. १० वेगवेगळ्या उत्पादनांसाठी १०६८३ कोटी रुपयांचे पॅकेज पुढील ५ वर्षांसाठी दिले जाईल. कापड उद्योगाला चालना देण्यासाठी किंवा पुनरुज्जीवित करण्यासाठी सरकारने जुलै महिन्यात ही रक्कम दिली होती. योजनेअंतर्गत छोट्या शहरांतील कंपन्यांना अधिक प्राधान्य दिले जाईल. पीयूष गोयल यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. “मुख्यत्वे गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा या राज्यांना या योजनेचा लाभ मिळेल. वस्त्र मंत्रालयाने पीएलआय योजनेच्या प्रस्तावाला आधीच मान्यता दिली होती. या योजनेतून सरकारने कापड उद्योगाला प्रोत्साहन देणे, रोजगार वाढवणे आणि निर्यात क्षमता वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे, असे पीयूष गोयल यांनी म्हटले आहे.

वस्त्रोद्योग मंत्री पुढे म्हणाले की टायर -३ आणि टायर -४ शहरांच्या आसपास असलेल्या कारखान्यांना प्राधान्य दिले जाईल, ज्याचा विशेषतः गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांना फायदा होईल. “आम्हाला आशा आहे की या निर्णयामुळे काही जागतिक चॅम्पियन तयार होतील,” गोयल म्हणाले.

केंद्र सरकारने चालू पीक वर्षासाठी गहू आणि मोहरीच्या किमान आधारभूत किंमतीत (एमएसपी) वाढ करण्याची घोषणा केली आहे. गव्हाच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल ४० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. वाढ झाल्यानंतर गहू किमान २,०१५ रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केला जाईल. या व्यतिरिक्त मोहरीचा एमएसपी ४०० रुपये प्रति क्विंटलने वाढवून ५,०५० रुपये करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

हरभऱ्याची आधारभूत किंमतीत १३० रुपयांनी वाढ करुन ती ५,२३० रुपये प्रति क्विंटल झाली आहे. मसूरच्या आधारभूत किंमतीमध्ये ४०० रुपयांनी वाढ केल्यानंतर ती प्रति क्विंटल ५,५०० रुपयांवर गेली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Union cabinet approves pli scheme for textile sector abn

ताज्या बातम्या