पुद्दुचेरीत राष्ट्रपती राजवट लागू करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पुद्दुचेरीमधील काँग्रेस सरकार सोमवारी विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाण्यापूर्वीच कोसळल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. विश्वासदर्शक ठराव मांडण्यासाठी एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं. मात्र अल्पमतात असणारं मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी सरकार ठरावला सामोरं जाण्याआधीच कोसळलं.

काँग्रेस आणि द्रमुकच्या प्रत्येकी एक आमदाराच्या राजीनाम्याने ३३ सदस्य असलेल्या विधानसभेत सत्तारुढ काँग्रेस आघाडीचं संख्याबळ ११ पर्यंत घसरलं होतं. विरोधी आघाडीकडे १४ सदस्य, तर सात जागा रिक्त आहेत. यामुळे नारायणस्वामी यांच्या सरकारवर बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली होती. पण विश्वासदर्शक ठरावात बहुमत सिद्द न करता आल्याने काँग्रेसचं सरकार कोसळलं.

हा तर राजकीय वेश्याव्यवसाय- मुख्यमंत्री

नारायणसामी सरकारचा ११ विरुद्ध ११ अशा मतांनी पराभव झाला. बहुमत ठराव सादर करण्यासाठी एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं. अधिवेशन सुरु होताच नारायणसामी यांनी बहुमतासाठी प्रस्ताव मांडला होता. पण काही वेळातच त्यांच्यासहित सत्ताधारी आमदारांनी सभात्याग केला. यानंतर अध्यक्षांनी काँग्रेस सरकार अल्पमतात असल्याचं जाहीर केलं. यानंतर मुख्यमंत्री नारायणसामी यांनी राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा सोपवला.