नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार संसदेच्या पावसाळी अधिवेशनानंतरच होण्याची शक्यता असली तरी, महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीत त्यावर आतापासूनच खलबते सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्रीपदांसाठी जोर लावण्यात येत असतानाच शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या एनडीए समावेशाचीही चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्तार करताना महाराष्ट्रातील महायुतीचे गणित सांभाळणे भाजपसाठी आव्हानात्मक ठरण्याची चिन्हे आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी दिल्लीत मंत्रीपदांबाबत सविस्तर चर्चा केल्याचे सांगितले जाते. शिवसेना ठाकरे गटातील सहा फुटीर खासदार शिंदे गटात सामील झाल्यानंतर या खासदारांनी पहिल्यांदाच शहांची भेट घेतली होती. या फुटीर खासदारांपैकी संजय जाधव, ओमराजे निंबाळकर यांना मंत्रीपदाची संधी मिळू शकते. त्यांच्यापैकी एकाला राज्यमंत्रीपद दिले जाण्याची शक्यता असून शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेटमंत्री केले जाऊ शकते. फुटीर गटाचे समन्वय करण्याचा आदेश शहांनी श्रीकांत शिंदेंना दिला आहे.

शिवसेना शिंदे गटाला केंद्रामध्ये तीन मंत्रीपदे दिली जाणार असतील तर महायुतीतील दुसरा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षालाही केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये सामील करून घ्यावे लागणार आहे. पक्षाचे नेते व खासदार पार्थ पवार यांना केंद्रीय मंत्रीपद दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पक्षाचे लोकसभेत एक व राज्यसभेत चार खासदार आहेत. मात्र पार्थ पवार यांना मंत्रीपद दिले गेले तर ज्येष्ठ नेते व राज्यसभेतील खासदार प्रफुल पटेल यांची संधी निसटण्याची शक्यता आहे. पक्षाच्या अध्यक्ष व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये राज्यातील अर्थ खाते परत दिले जावे, अशी विनंती केल्याचे सांगितले जाते. मात्र, याबाबत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतलेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अर्थमंत्रालय सुनेत्रा पवार यांना देण्याच्या निर्णय झाला नसल्याचे दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले होते.

केंद्र सरकारला संसदेमध्ये लोकसभा मतदारसंघांच्या फेररचनेचे घटनादुरुस्ती विधेयक संमत करायचे असून दोनतृतीयांश सदस्यांच्या पाठिंब्याची जुळवाजुळव केली जात आहे. प्रत्येक राज्यात ५० टक्के वाढीव जागा दिल्या गेल्या तर या विधेयकाला पाठिंबा देण्याची भूमिका शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे. त्यानिमित्ताने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेनेही जोर धरला आहे. या विलीनीकरणाच्या चर्चा पक्षाच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी फेटाळल्या आहेत. मात्र, या पक्षाचे राज्यातील नेते जयंत पवार यांनी फडणवीस व शिंदे यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष एनडीएमध्ये सामील होण्याच्या चर्चांना बळ मिळाले आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएत सामील झाला तर राज्यात तसेच केंद्रातही या पक्षाला मंत्रीपद द्यावे लागणार आहे. राज्यात जयंत पाटील यांच्याकडे अर्थ खाते सोपवून सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रीपद दिले जाऊ शकते अशा चर्चांना दिल्लीत उत आला आहे. सुळे यांनी त्याचे सातत्याने खंडन केले आहे.

आधी कार्यकारिणी मग मंत्रिमंडळ

’संसदेचे पावसाळी अधिवेशन पुढील आठवड्यामध्ये सुरू होत असून त्यासंदर्भातील रणनीती निश्चित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन व संघटना महासचिव बी. एल. संतोष यांची बैठक झाल्याचे समजते.

’सलग दोन दिवस मोदी वरिष्ठ नेत्यांच्या बैठका घेत असून त्यात भाजपच्या नव्या कार्यकारिणीतील सदस्यांची नावे निश्चित झाल्याचे समजते. पुढील काही दिवसांमध्ये पक्षाध्यक्ष नितीन नवीन यांच्या नव्या चमूची घोषणा होण्याची शक्यता आहे.

’कार्यकारिणी निवडीनंतर केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलावर निर्णय घेतला जाऊ शकतो. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर ऑगस्टच्या अखेरीस किंवा सप्टेंबरपर्यंत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.