केंद्रीय शिक्षण मंत्र्यांकडून सद्यस्थितीचा आढावा

करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशव्यापी टाळेबंदीचा भाग म्हणून गेल्या वर्षी मार्चमध्ये शाळा बंद करण्यात आल्या होत्या.

नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बुधवारी मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन अनेक राज्यांतील शाळा पुन्हा सुरू होण्याबाबतची सद्यस्थिती व तेथील कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा आराखडा याबाबतचा आढावा घेतला. करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशव्यापी टाळेबंदीचा भाग म्हणून गेल्या वर्षी मार्चमध्ये शाळा बंद करण्यात आल्या होत्या.

केंद्र सरकारने संबंधित राज्यांतील करोनाविषयक परिस्थितीनुसार शाळा पुन्हा सुरू करण्याची गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये राज्यांना परवानगी दिली होती. काही राज्यांनी शाळा अंशत: उघडण्यास सुरुवात केली, मात्र देशाला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा बसल्यानंतर यावर्षी एप्रिलमध्ये शाळा पूर्णपणे बंद करण्यात आल्या होत्या.

करोनाविषयक परिस्थितीत सुधारणा झाल्यामुळे अनेक राज्यांनी शाळा पुन्हा सुरू केल्या असल्या, तरी तेथील शिक्षक व कर्मचारी यांचे संपूर्ण लसीकरण न झाल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Union education minister dharmendra pradhan state schools resume vaccination plan akp