केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा ईशान्य भारतातील दोन दिवसीय दौरा रद्द झाला आहे.  सध्या नागरिकत्व दुरूस्ती विधेयकावरून ईशान्य भारतात जोरदार आंदोलन सुरू आहेत. आसाममध्ये या आंदोलनास हिंसक वळण लागल्याचे दिसत आहे. गुरुवारी गुवाहाटीत कथित पोलीस गोळीबारात दोन जण ठार झाल्याने, परिस्थिती आणखी चिघळल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपला मेघालय व अरुणाचल प्रदेशचा दोन दिवसीय दौरा रद्द केला असल्याचे दिसत आहे.  रविवार आणि सोमवारी गृहमंत्री या राज्यांच्या दौऱ्यावर जाणार होते.

नागरिकत्व दुरूस्ती विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आता याचं कायद्यात रूपांतर झालं आहे. गुरूवारी रात्री राष्ट्रपतींनी या विधेयकावर स्वाक्षरी केली. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक बुधवारी राज्यसभेतही आठ तासांच्या चर्चेनंतर मंजूर करण्यात आलं. विधेयकाच्या बाजूनं १२५ तर, विरोधात १०५ मतं पडली. ईशान्य भारतात या विधेयकावरून आंदोलन सुरू असताना पश्चिम बंगाल, केरळनंतर आता पंजाबनेही राज्यात विधेयकांचा अंमलबजावणी केली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर ईशान्य भारतातील स्थिती तणावपूर्ण बनली आहे. याची सर्वाधिक झळ आसामला पोहोचली असून, गुवाहाटीत संचारबंदी मोडून लोक रस्त्यावर उतरलेत. दिब्रुगडमध्ये आंदोलकांनी रेल्वे स्थानक पेटवले. गुवाहाटीत निदर्शनांदरम्यान २ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. लखीमपूर, तिनसुकिया, धेमाजी, डिब्रूगड, कारेडियो, सिवसागर, जोरहाट, होलाहाट आणि कामरुप अशा १० जिल्ह्यांमध्ये मोबाईल सेवा बंद ठेवण्याचा कालावधी आणखी ४८ तासांनी वाढवण्यात आला आहे. त्रिपुरातील परिस्थितीही नियंत्रणाबाहेर गेली असल्याची माहिती समोर आली होती.