काश्मीर प्रश्न सोडविण्यापासून कोणतीही शक्ती अडवू शकणार नाही

सरकारने काश्मीरमध्ये आतंकवादाविरोधात लढण्यासाठी बिनशर्त परवानगी दिली आहे.

गुजरात गौरव यात्रेवेळी राजनाथ सिंग यांचे भाजपच्या नेत्यांनी स्वागत केले.

राजनाथ सिंग; भाजपची सुरतमध्ये गुजरात गौरव यात्रा

केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने काश्मीरमध्ये आतंकवादाविरोधात लढण्यासाठी बिनशर्त परवानगी दिली आहे. काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यापासून भारताला कोणतीही दुष्ट शक्ती रोखू शकणार नसल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी गुजरातमध्ये केले. या वेळी त्यांनी पाकिस्तानच्या आगळिकीवरही जोरदार टीका केली.

सुरत जिल्ह्यातील भाजपच्या गुजरात गौरव यात्रेमध्ये ते बोलत होते. काश्मीरच्या भवितव्याबाबत कोणीही चिंता करू नये. भारत त्यासाठी सक्षम आहे. जगातील कोणतीही शक्ती आपल्याला रोखू शकणार नाही. पाकिस्तान हा शेजारी आहे. मात्र, तो देश नेहमी ‘नापाक’ कृत्ये करत असतो. भारतामध्ये दहशत माजविण्यासाठी नेहमी प्रशिक्षण देऊन दहशतवादी पाठविण्याचे काम करत असल्याची टीका त्यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाची अखंडता, सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी सर्व राजशिष्टाचार मोडून शेजारच्या पाकिस्तानातही तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांना जाऊन भेट घेतली होती. परंतु, पाकिस्तान काही सुधरला नाही. हे फार काळ चालणार नसल्याचेही, राजनाथ यांनी स्पष्ट केले.

भारतीय लष्कराला दिलेल्या परवानगीबाबत त्यांनी सांगितले की, पाकिस्तानकडून जर गोळीबार होत असेल तर लष्कराने पांढऱ्या झेंडय़ाचे निशाण न दाखवता चोख प्रत्युत्तर द्यावे. दहशतवाद्यांविरोधात कोणताही मुलाहिजा न बाळगता कारवाई करण्यास सांगितले आहे. यामुळेच दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचा बीमोड होत आहे. दर दिवशी किमान एक ते पाच दहशतवादी मारले जात आहेत. यामुळे जवानांचे मनोधैर्यही वाढत आहे. हे यापूर्वी कधीही झाले नसल्याचे राजनाथ म्हणाले.

..तर काश्मीर प्रश्न उरलाच नसता

बारडोलीमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी ब्रिटिशांविरोधात १९२८मध्ये शेतकऱ्यांसाठी सत्याग्रह केला होता. जुनागढ, हैदराबाद संस्थानांना स्वतंत्र भारतामध्ये सामील होण्यास भाग पाडणाऱ्या पटेलांना जर तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी काश्मीरबाबत अडविले नसते तर आज देशासमोर काश्मीरचा प्रश्नच उभा ठाकला नसता, अशी टीका राजनाथ यांनी काँग्रेसवर केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Union home minister rajnath singh to attend gujarat gaurav yatra in surat