केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा  व इतरांकडून जप्त करण्यात आलेली लखीमपूर हिंसाचारातील शस्त्रे ही रिकामी म्हणजे गोळ्यांविना आढळून आली आहेत, असे फोरेन्सिक अहवालात म्हटले आहे.

आशिष मिश्रा याने  आंदोलनकारी शेतकऱ्यांवर गोळीबार केल्याचा आरोप आहे. त्या पार्श्वभूमीवर फोरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या अहवालात म्हटले आहे,की ही शस्त्रे रिकामी होती. याचा अर्थ त्याच दिवशी या  शस्त्रांमधून गोळीबार झाला असे म्हणता येत नाही, इतर कुठल्या दिवशीही गोळीबार झालेला असू शकतो. आशिष मिश्रा उर्फ मोनू मिश्रा याच्याकडून चार शस्त्रे जप्त करण्यात आले होती. यातील पिस्तुल हे माजी केंद्रीय मंत्री अखिलेश दास यांच्या पुतण्याचे होते. दास याचा अंगरक्षक लतीफ काळे याच्याकडून रिपीटर गन जप्त करण्यात आली. फोरेन्सिक अहवालातील चौथे शस्त्र हे दास याचा सहकारी सत्य प्रकाश याचे रिव्हॉल्व्हर असून त्याचा अहवाल अजून आलेला नाही.

जप्त  करण्यात आलेल्या तीन शस्त्रातून गोळीबार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात आशिष मिश्रा याच्या रायफलीचा समावेश आहे. पण त्यातून गोळीबार केव्हा झाला हे समजू शकलेले नाही. विशेष चौकशी पथक अजून चौकशी करीत असून त्यांनी फोरेन्सिक अहवालावर प्रतिक्रिया दिलेली नाही. आशिष मिश्रा, दास व काले यांच्याकडून परवाना असलेली शस्त्रे जप्त करण्यात आली होती त्यात रायफल, पिस्तूल, रिव्हॉल्व्हर व रिपीटर गनचा समावेश आहे.

बहराईच जिल्ह्यातील रहिवासी जगजित सिंग यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा कट मंत्री व त्यांच्या मुलाने आखला होता असा आरोप सिंग यांनी केला आहे.