काश्मीर खोऱ्यात ‘अफस्पा’ कायदा लागू करण्याचा निर्णय काँग्रेसप्रणित यूपीए सरकारनेच घेतला होता. या निर्णयाच्या वेळी पी. चिदम्बरम् हे केंद्रातील महत्त्वाचे पद भूषवीत होते. तेव्हा या कायद्याच्या आधारे भाजपवर टीका करण्याचा चिदम्बरम् आणि काँग्रेसला काहीही अधिकार नाही, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी चिदम्बरम् यांना फटकारले.
काश्मीर खोऱ्यात अतिरेकी कारवाया वाढू लागल्यानंतर यूपीए सरकारने तेथे ‘आर्मड् फोर्सेस स्पेशल पॉवर अ‍ॅक्ट’ हा कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांसाठी काश्मीर खोरे हे नंदनवन ठरू लागले होते, याची आठवण माजी केंद्रीय गृहमंत्र्यांना करून द्यावी लागणार आहे का, असा टोमणाही नक्वी यांनी मारला.
तुम्ही समस्या निर्माण करायच्या आणि जेव्हा संबंधित सरकार त्या समस्येवर उपाययोजना करू पाहील तेव्हा केवळ राजकीय नफ्याची गणिते डोळ्यासमोर ठेवून तुम्ही त्यांना विरोध करायचा हे योग्य नाही, असेही  नक्वी यांनी बजावले.नक्वी यांनी काँग्रेस नेते सलमान खुर्शिद यांच्यावरही टीका केली. नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे मुल्यमापन खुल्या मनाने करा असे त्यांनी सुचवले. जनधन योजना, स्वच्छ भारत अभियान, डिझेलच्या किंमती बाजारपेठेवर आधारीत ठेवणे असे प्रमुख निर्णय सरकारने घेतले आहे. त्यामुळे यावर आधारीत निष्कर्ष काढा  वर्षभर कशाला थांबता असा सल्ला नक्वी यांनी दिला.