नवी दिल्ली : केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या भेटीला गेलेल्या शिष्टमंडळात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा समावेश नव्हता. पण दुसऱ्या दिवशी, बुधवारी त्यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. मुंडे यांच्या भेटीनंतर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनीही गडकरी यांच्याशी चर्चा केली. मुंडे आणि राऊत यांनी मतदारसंघातील प्रश्नांसंदर्भात निवेदन दिल्याचे सांगितले.

पंकजा मुंडे सोमवारपासून दिल्लीत असून पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी बोलावलेल्या राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला त्या उपस्थित राहिल्या होत्या. मात्र, केंद्रीय मंत्री अमित शहा यांना भेटलेल्या भाजपच्या सहकार नेत्यांच्या शिष्टमंडळात पंकजा मुंडे यांची गैरहजेरी चर्चेचा मुद्दा बनला आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या शिष्टमंडळात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच, अन्य भाजप नेतेही होते. या शिष्टमंडळात पंकजा यांचा समावेश केला गेला नाही की, त्या शिष्टमंडळापासून लांब राहिल्या, असा प्रश्न विचारला जात आहे. पण, शहा यांच्याकडे मुद्दे मांडायचे असतील तर आपण शहांची स्वतंत्र भेट घेऊ, असे पंकजा मुंडे यांनी गडकरी यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांना सांगितले.

फडणवीस यांच्या शिष्टमंडळात त्यांचा समावेश का नव्हता, याबद्दल मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला. सहकारी साखर कारखानदारांचे प्रश्न मांडले जात आहेत, ही योग्य बाब असल्याचे त्या म्हणाल्या. शिष्टमंडळाने शहांना भेटण्याआधी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पंकजा यांनी साखर कारखान्यांसाठी आर्थिक मदत देण्याची मागणी केली होती. बीडमधील विकास कामांसंदर्भात गडकरी यांच्याशी चर्चा केल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. या भेटीत खासदार प्रीतम मुंडेही उपस्थित होत्या.

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनीही गडकरी यांची भेट घेतली. मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर ते लांजा दरम्यानच्या रस्त्याचे काम गेली तीन वर्षे रखडले आहे. तसेच, मुख्य कंत्राटदाराने २७ कोटी रुपये थकवले असून थकबाकी तातडीने मिळाली नाही तर उपकंत्राटदारांना रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही. ही गंभीर बाब असून यासंदर्भात हस्तक्षेप करून प्रश्न सोडवण्याची मागणी गडकरी यांना केल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.