दिल्लीतील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा जंतरमंतरवर आंदोलन करत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. तर दुसरीकडे, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांनी शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर टिप्पणी केली आहे. “राकेश टिकैत दो कौड़ी का आदमी” म्हणत मिश्रा यांनी टिकैत यांच्यावर निशाणा साधला आहे. लखीमपूर कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सभेत मिश्रा यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

हेही वाचा- “…तर हे सरकार अमान्य ठरू शकतं” सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीपूर्वी घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विधान

टिकैत यांच्यावर निशाणा

“प्रत्येक जण आपल्या स्वभावानुसार वागतो. मी राकेश टिकैत यांना चांगला ओळखतो. राकेश टिकैत दो कौड़ी का आदमी आहे. त्यांनी दोन वेळा निवडणूक लढवली आणि दोन्ही वेळा त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. अशा व्यक्तीने कोणाचा विरोध केला तर त्याला काही अर्थ नाही. म्हणूनच मी अशा लोकांना उत्तरही देत ​​नसल्याचेही मिश्रा म्हणाले.

टिकैत यांचे प्रत्युत्तर

मिश्रा यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर राकेश टिकैत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मिश्रा यांचा मुलगा मुलगा वर्षभरापासून तुरुंगात आहे त्यामुळे ते चिडले आहेत. लखीमपूरमध्ये गुंडराज आहे आणि लोक त्यांना घाबरतात. पण आम्ही ‘लखीमपूर मुक्ती अभियान’ राबवू असे प्रत्युत्तर टिकैत यांनी दिले आहे.

हेही वाचा- बिल्किस बानो प्रकरण: गुजरात सरकारच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

जंतर-मंतरवर शेतकऱ्यांचे आंदोलन

संयुक्त किसान मोर्चा’मध्ये सहभागी झालेल्या काही शेतकरी संघटनांनी सोमवारी जंतर-मंतर गाठून बेरोजगारी, हमीभाव आदी मुद्दय़ांसाठी आंदोलन केले. पंजाब, हरियाणा व पश्चिम उत्तर प्रदेशमधील संघटना या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या. मात्र, आंदोलनाची हाक ‘संयुक्त किसान मोर्चा’ने नव्हे तर, पंजाबमधील ‘भारतीय किसान युनियन’-दल्लेवाल गटाने दिली होती.

‘‘देशात लोक केंद्रातील सरकारवर नाराज आहेत. रेल्वे कर्मचारी असेल, पोलीस असतील अगदी न्यायाधीश सुद्धा दु:खी आहेत. पण, उघडपणे ते बोलत नाहीत. पूर्वी राजकीय पक्ष फोडले जात. आता भाजप शेतकरी संघटना फोडू लागला आहे. त्यामुळे पुढील टप्प्यांमध्ये भाजपच्या फोडाफोडीचे राजकारण रोखण्यासाठी रणनिती आखावी लागणार आहे, असे टिकैत म्हणाले.