scorecardresearch

दोन दुकानात लुटमार प्रकरण: आरोपी केंद्रीय मंत्री निसिथ प्रमाणिक कोर्टात हजर

निसिथ प्रमाणिक हे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार आहेत.

दोन दुकानात लुटमार प्रकरण: आरोपी केंद्रीय मंत्री निसिथ प्रमाणिक कोर्टात हजर
भाजपा खासदार व केंद्रीय राज्य गृहमंत्री निसिथ प्रमाणिक (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

भारतीय जनता पार्टीचे नेते आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री निसिथ प्रमाणिक एका चोरीच्या प्रकरणात मंगळवारी न्यायालयात हजर झाले. २००९ मध्ये घडलेल्या एका चोरीच्या गुन्ह्यात निसिथ प्रमाणिक हे आरोपी आहेत. कोलकोत्ता उच्च न्यायालयात अलीकडेच याबाबत सुनावणी झाली होती. उच्च न्यायालयाने निसिथ प्रमाणिक यांना अलिपूरद्वार न्यायालयात वैयक्तिक हजर राहण्याचा आदेश दिला होता. ७ ते १२ जानेवारीदरम्यान न्यायालयात हजर राहावं, असा आदेश न्यायालयाने दिला.

यानंतर केंद्रीय गृह राज्यमंत्री निसिथ प्रमाणिक हे न्यायालयाने दिलेली मुदत संपण्याच्या दोन दिवस आधीच अलिपूरद्वार न्यायालयात वैयक्तिकरित्या हजर झाले. यावेळी अलिपूरद्वार न्यायालयाच्या न्यायदंडाधिकारी मौमिता मलिक यांनी प्रमाणिक यांना भविष्यातील न्यायालयीन सुनावणीत वैयक्तिकरित्या हजर राहण्यापासून सूट दिली.

हेही वाचा- “बारामतीत चुलते आणि पुतणे दिवसा दरोडे टाकतात” म्हणणाऱ्या पडळकरांवर अजित पवार संतापले; म्हणाले, “तो काय…”

निसिथ प्रमाणिक हे पश्चिम बंगालच्या कूचबिहारचे भाजपा खासदार आहेत. २००९ मध्ये प्रमाणिक यांच्याविरोधात दोन दुकानात दरोडा टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी अलिपूरद्वार न्यायालयाने १६ नोव्हेंबर २०२२ रोजी अटक वॉरंट जारी केले होते. तथापि, कोलकाता उच्च न्यायालयाने २३ नोव्हेंबर रोजी मंत्र्याच्या विरोधात वॉरंटला स्थगिती दिली. त्यानंतर ७ जानेवारी ते १२ जानेवारी २०२३ दरम्यान, निसिथ प्रमाणिक यांनी अलिपूरद्वार न्यायालयात वैयक्तिकरित्या हजर राहावं, असे निर्देश कोलकाता उच्च न्यायालयाने दिले.

हेही वाचा- “जर कुणी जाणीवपूर्वक गोवण्याचा प्रयत्न केला, तर…,” अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारला थेट इशारा

२००९ मध्ये अलिपूरद्वार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु पोलिसांनी प्रमाणिक यांना चुकीच्या पद्धतीने या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला, असा दावा प्रमाणिक यांच्या वकिलांनी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-01-2023 at 21:08 IST

संबंधित बातम्या