Shivraj Singh Chouhan On Rahul Gandhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते, खासदार राहुल गांधी हे सध्या चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते तेथील भारतीय नागरिकांशीही संवाद साधणार आहेत. मात्र, त्याआधी राहुल गांधींनी व्हर्जिनियातील हेरंडन येथे एका कार्यक्रमात बोलताना विविध विषयासंदर्भात भाष्य करत भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. तसेच यावेळी बोलताना राहुल गांधींनी शीख धर्मीयांशी संबंधित केलेल्या एका वक्तव्यामुळे भाजपाने राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. तसेच राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत. मात्र, त्यांनी परदेशात जाऊन केलेल्या टीकेवरून भाजपाचे नेते, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचं उदाहरण देत त्यांच्यामध्ये आणि राहुल गांधींमध्ये काय फरक होता? हे सांगत राहुल गांधींवर टीका केली आहे. यासंदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

राहुल गांधींनी काय म्हटलं?

“यासाठी लढा सुरु आहे की भारतात शिखांना पगडी घालण्याची परवानगी दिली जाईल? शीखांना भारतात कडा घालण्याची परवानगी दिली जाईल? ते गुरुद्वारामध्ये जाऊ शकतील? फक्त शीख धर्मीयांसाठी हा लढा नाही, तर सर्व धर्मांसाठी आहे”, असं राहुल गांधींनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानानंतर भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते आरपी सिंह यांनी राहुल गांधींवर भाजपाने हल्लाबोल केला आहे.

हेही वाचा : Rahul Gandhi in US: ‘५६ इंचाची छाती आणि थेट देवाशी संबंध’, राहुल गांधी मोदींबद्दल अमेरिकेत काय म्हणाले…

शिवराज सिंह चौहान काय म्हणाले?

राहुल गांधींच्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “विरोधी पक्षनेते म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांनी परदेशात कधीही सरकारवर टीका केली नाही. राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आहेत. विरोधी पक्षनेतेपद हे एक जबाबदार पद आहे. मला राहुल गांधींना आठवण करून द्यायची आहे की, अटलबिहारी वाजपेयी जेव्हा विरोधी पक्षनेते होते, तेव्हा ते परदेशात गेल्यानंतर त्यांनी कधीही देशाची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र, आता काँग्रेस सलग तिसऱ्यांदा पराभूत झाल्यामुळे राहुल गांधींच्या मनात भाजपाविरोधी, ‘आरएसएस’विरोधी आणि मोदींच्या विरोधी भावना रुजल्या आहेत. त्यामुळे प्रतिमा खराब करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे. मग आणीबाणी कोणी लादली? आता काँग्रेसने काही दिवसांपूर्वी भारत जोडो यात्रा काढली पण राहुल गांधी हे कधीही भारताशी आणि भारतातील लोकांशी एकजूट होऊ शकले नाहीत”, अशी टीका शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे.

आरपी सिंह काय म्हणाले?

राहुल गांधींनी केलेल्या विधानाला प्रत्युत्तर देताना आरपी सिंह म्हणाले, “१९८४ मध्ये दिल्लीत तीन हजार शीखांची हत्या करण्यात आली. त्यांच्या पगड्या काढण्यात आल्या. केस कापण्यात आले, दाढी काढण्यात आली. मग हे सर्व झालं तेव्हा देशात काँग्रेसची सत्ता होती, हे राहुल गांधी सांगत नाहीत. आता मी राहुल गांधी यांना आव्हान देतो की, ते शिखांबद्दल जे बोलले आहेत, ते त्यांनी पुन्हा भारतात बोलावं. मी त्यांच्यावर गुन्हा दाखल करेन, त्यांना न्यायालयात खेचू”, असं आरपी सिंह यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह काय म्हणाले?

राहुल गांधींच्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “अनेक वर्षांपासून तुष्टीकरणाचे राजकारण करणारी आणि शीख हत्याकांडासाठी जबाबदार असलेली काँग्रेस आता व्याख्यान देण्याचा प्रयत्न करत आहे. राहुल गांधींनी लिखित स्वरूपात ४०० जागा मिळवून देऊ, असा दावा केला होता. मात्र, काँग्रेस फक्त ९९ पेक्षा जास्त जागा जिंकू शकलं नाही आणि ते आता ४०० जागा जिंकण्याविषयी बोलत आहेत. अशा दाव्यांना जोरदार प्रत्युत्तर द्यावं लागेल”, असं मंत्री गिरीराज सिंह यांनी म्हटलं आहे.