काँग्रेस आणि इंडिया आघाडीने ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मोर्चा काढला आहे. या मोर्चाच्या आधी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले की दिल्लीला छावणीचं स्वरूप आणलं गेलं आहे आणि काहीही करून ज्ञानेश कुमार यांचा बचाव केला जातो आहे असा आरोप त्यांनी केला. दरम्यान केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेस हे सगळं खुर्ची मिळवण्यासाठी करत असल्याचं म्हणत आरोपाना उत्तर दिलं आहे.
काँग्रेस त्यांच्या विचारशून्य नेतृत्वामुळे निवडणुका हारते आहे-शिवराज सिंह चौहान
काँग्रेस एकापाठोपाठ निवडणुका सातत्याने हारते आहे. आता आंदोलन करून काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरतो आहे. आता काँग्रेस संवैधानिक संस्थांवर हल्ला करतंय आहे. पण मी काँग्रेसला सांगू इच्छितो की काँग्रेसच्या पराभवाचं कारण निवडणूक आयोग नाही तर काँग्रेसचं विचारशून्य नेतृत्व आहे अशी टीका केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे.
काँग्रेसची अवस्था फारच वाईट झाली आहे
शिवराज सिंह चौहान म्हणाले, आज काँग्रेसची अवस्था काय आहे बघा. उत्तर प्रदेशात त्यांना कुणी विचारत नाही. पंजाबमध्ये त्यांना प्रदेशाध्यक्ष बदलावा लागला आहे. विविध ठिकाणी त्यांच्या पक्षात नेतृत्वासाठी वाद चालले आहेत. कर्नाटकात कधी सिद्धरामय्या तर कधी डी.के शिवकुमार यांच्यात संघर्ष सुरू आहे. तेलंगणातही अवस्था वाईट आहे. मी काँग्रेसमधल्या नेत्यांना सांगू शकतो की त्यांच्या पराभवाचं कारण इतर काहीही नाही. काँग्रेस पक्ष लोकांच्या मनातून उतरला आहे. जो पक्ष आता संविधानाच्या गोष्टी रतो आहे त्यांना तो अधिकार नाही कारण त्यांनी ९० हून अधिक सरकारं अशीच बदलली आहेत. पराभवाचं कारण काँग्रेसचं नेतृत्व आहे. देशाची परंपरा, देशाचे लोक याबाबत या नेतृत्वाला काही माहीत नाही.
नाचता येईना अंगण वाकडे अशी काँग्रेसची अवस्था-शिवराज सिंह चौहान
नाचता येईना अंगण वाकडं अशी काँग्रेसची सध्याची अवस्था आहे. कपडे बदलल्याप्रमाणे यांनी मुख्यमंत्री बदलले आहेत. देशात लोकशाहीचा गळचेपी करून काँग्रेसने आणीबाणी लावली. आज काँग्रेसची अवस्था काय ? देशातल्या प्रमुख राज्यांमध्ये काँग्रेसचा सफाया झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये ४९ वर्षांपासून काँग्रेस नाही. तामिळनाडूमध्येही तशीच स्थिती आहे. सिक्कीम मध्ये ४२ वर्षे, उत्तर प्रदेशात ३७ वर्षे, बिहारमध्ये ३६ वर्षे, गुजरातमध्ये ३१ वर्षे, ओडिशामध्ये २६ वर्षांपासून, नागालँडमध्ये २३ वर्षांपासून, दिल्लीत १३ वर्षांपासून काँग्रेस नाही. तीन ते चार राज्यं सोडली तर इतर राज्यांमध्येही काँग्रेस ज्युनिअर पार्टी झाली आहे. असंही शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. ज्या राज्यांमध्ये काँग्रेस लहान आहे आणि इतर पक्ष मोठे. एक ज्युनिअर पार्टनर आणि परजिवी पक्ष म्हणजे काँग्रेस. काँग्रेस खुर्चीसाठी आता संविधानाने मान्यता दिलेल्या संस्थांवर हल्ले करते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेच्या मनांवर राज्य करत आहेत. काँग्रेसला हे जन्मात जमणार नाही. त्यामुळे त्रासलेली काँग्रेस आता रस्त्यावर उतरली आणि अराजक निर्माण करत आहेत.
