केंद्रीय मंत्री संजय कुमार बंडी यांचा मुलगा भगीरथ साई याला अटक करण्यात आली. अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणात पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत तेलंगण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. एका अल्पवयीन मुलीचं शोषण केल्याचा आरोप भगीरथ साईवर आहेत. केंद्रीय मंत्री संजय कुमार बंडी हे गृहराज्य मंत्री आहेत तसंच भाजपाचे खासदारही आहेत. न्यायव्यवस्थेसमोर सगळे समान आहेत. माझ्या मुलाचं म्हणणं आहे की त्याने गैरवर्तन केलेलं नाही. मात्र आता त्याला पोलिसांनी अटक केली आहे. तपासात सत्य काय ते समोर येईल असं संजय कुमार यांनी म्हटलं आहे.

टीआरएसच्या अध्यक्षा कविता यांनी काय मागणी केली?

सायबराबाद पोलिसांनी केंद्रीय मंत्री बंडी संजय कुमार यांचा मुलगा भगीरथ साई विरोध लुकआऊट सर्क्युलर जारी केलं होतं. त्यानुसार त्याला देश सोडून जाण्याची संमती नव्हती. दुसरीकडे तेलंगणा रक्षण सेनेच्या अध्यक्षा कविता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी केली आहे की या प्रकरणाची निष्पक्षपाती पणे चौकशी व्हावी यासाठी संजय कुमार यांना केंद्रीय मंत्रिपदावरुन हटवण्यात यावं. त्यांच्या मुलावर पॉक्सोच्या अंतर्गत आरोप झाले असून हे प्रकरण गंभीर आहे त्यामुळे तातडीने संजय कुमार यांना पदावरुन हटवण्यात यावं आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना मंत्रिमंडळात घेऊ नये.

प्रकरण नेमकं काय आहे?

भारतीय न्याय संहितेतील पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत भगीरथ साई विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. १७ वर्षांच्या एका मुलीचं शोषण केल्याची तक्रार तिच्या आईने दाखल केली. सदर मुलीच्या आईने असाही आरोप केला आहे की भगीरथ साईचे तिच्या मुलीशी संबंध होते आणि त्याने तिचं लैंगिक शोषण केलं, लैंगिक छळही केला. पीडितेने दिलेल्या जबाबानंतर या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भगीरथनेही या प्रकरणात एक तक्रार दाखल केली. ज्यात त्याने आरोप केला होता की सदर मुलीने तिच्या कौटुंबिक कार्यक्रमात आणि सामूहिक आयोजन असलेल्या ठिकाणी बोलावलं होतं. तसंच आम्ही काही मंदिरांमध्येही गेलो होतो. मुलीच्या आई वडिलांनी माझ्यावर लग्नासाठी दबाव आणला. त्यानंतर पैसेही मागितले. ते दिले नाहीत तर आम्ही तुझ्या विरोधात खोटी तक्रार दाखल करु अशी धमकी मला दिली. ज्यानुसार मला अडकवलं जातं आहे अशी तक्रार भगीरथ साईने दाखल केली होती. भगीरथने त्याच्या तक्रारीत हा दावाही केला आहे की सदर मुलीच्या वडिलांना मी ५० हजार रुपये दिले होते. मात्र नंतर या मुलीच्या कुटुंबाने पाच कोटी रुपये मागितले. पाच कोटी रुपये देण्यास मी नकार दिला तेव्हा तिच्या आईने आत्महत्या करण्याचीही धमकी दिली असंही भगीरथ साईने तक्रारीत म्हटलं आहे.

पोलिसांनी काय सांगितलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीच्या जबाबानंतर आम्ही पॉक्सोच्या अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केला आहे. लैंगिक छळ आणि लैंगिक शोषणाचा गुन्हा आम्ही नोंदवली आहे. भगीरथ साई विरोधात या मुलीने आणि तिच्या कुटुंबाने तक्रार केली आहे. सदर मुलीचा जबाबही आम्ही रेकॉर्ड केला आहे असं पोलिसांनी सांगितलं. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

संजय कुमार यांनी काय म्हटलं आहे?

मुलाला अटक झाल्यानंतर संजय कुमार यांनी पोस्ट करुन सत्यमेव जयते असं म्हणत मला न्यायव्यवस्थेबाबत पूर्ण आदर आहे. माझा मुलगा पोलिसांसमोर आला. त्याच्यासह आमचे वकीलही आहेत. अशी पोस्ट संजय कुमार बंडी यांनी केली आहे. मी आधीही म्हटलं आहे तेच पुन्हा सांगतो आहे. कायद्यापुढे सगळे समान आहेत. माझा मुलगा असो किंवा आणखी कुणीही असो. सगळ्यांसाठी न्यायव्यवस्था समान आहे. माझा मुलगा सातत्याने हे सांगतो आहे की तो या प्रकरणात दोषी नाही. या प्रकरणात कायदे तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर आणि त्यांना सगळे पुरावेही आम्ही दिले आहेत. आम्हाला त्यांनी हा सल्ला दिला की जे काही व्हायचं आहे ते कायदेशीर मार्गाने होऊ द्या. माझा मुलगा तपासात पूर्ण सहकार्य करेल याची मला खात्री आहे असंही संजय कुमार यांनी म्हटलं आहे.

मला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. आमच्या वकिलांची टीम सर्वोतोपरी प्रयत्न करते आहे. जे काही आरोप झाले आहेत ते गंभीर आहेत. पण न्याय व्यवस्थेचा आदर हा प्रत्येकानेच ठेवला पाहिजे तो आदर मलाही आहे. असंही संजय कुमार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

न्यायालयात नेमकं काय घडलं?

मुलीचे वकील काय म्हणाले? : या प्रकरणातला जो आरोपी आहे त्याचं कुटुंब प्रभावशाली आहे कारण आरोपीचे वडील केंद्रीय गृहराज्य मंत्री आहेत. आम्हाला असं वाटतं आहे की या प्रकरणातले जे पुरावे आहेत त्या पुराव्यांशी छेडछाड होऊ शकते. आरोपीला कुठलीही सवलत देता कामा नये ही आमची प्रमुख मागणी आहे.

बचाव पक्षाचे वकील काय म्हणाले?

या प्रकरणात अंतिम सुनावणीपर्यंत अंतरिम जामीन देण्याता अधिकार न्यायालयाला आहे. ज्यांनी तक्रार केली आहे त्यांनीही ही बाब नाकारलेली नाही की त्यांची मुलगी ही भगीरथ साई यांच्यासह २०२५ पासून संबंधात होती. कुटुंबाने लग्नासाठी दबाव आणला होता आणि पाच कोटी रुपयांची मागणी केली होती. ज्यानंतर आता ही तक्रार करुन माझ्या अशीलाला त्यात गोवलं जातं आहे. खोट्या प्रकरणात अडकवू अशी धमकीही त्याला देण्यात आली होती असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी केला. आता या प्रकरणी नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.