उत्तर प्रदेशातल्या १० राज्यसभेच्या जागांसाठी भाजपाने ८ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ज्या नावांची चर्चा होती ती नावं या यादीत नाहीत. भाजपाने जी नावं जाहीर केली आहेत ती पाहता स्थानिक आणि जातीय समीकरण भाजपाने साधलं आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तसंच हरदीप पुरी, स्मृती ईराणी यांची नावं यादीत नाहीत. उत्तर प्रदेशात येऊ घातलेली विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन ही यादी जाहीर करण्यात आल्याचं दिसून येतं आहे.

ज्या नावांची चर्चा होती ती नावं नाहीत

मागील काही दिवसांपासून राज्यसभेवर ज्यांना पाठवण्यात येईल त्यात हरदीप पुरी, स्मृती ईराणी, हरिश द्विवेदी आणि बी. एल. वर्मा या नावांची जोरदार चर्चा होती. मात्र जी आठ नावांची यादी समोर आली आहेत त्यात यातलं एकही नाव नाही. माजी खासदार कौशल किशोर आणि संजीव बलियान यांच्या नावांचीही चर्चा होती पण त्यांनाही राज्यसभेचं तिकिट मिळालेलं नाही.

स्मृती ईराणींना का मिळालं नाही राज्यसभेचं तिकिट?

भाजपामध्ये नवनियुक्त सरचिटणीसांना राज्यसभेवर पाठवण्याचा पायंडा हा गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे. मागच्या दहा वर्षात जे जे सरचिटणीस राज्यसभेवर गेले आहेत त्यांना पद सांभाळल्यानंतर काही काळाने राज्यसभेची संधी देण्यात आली आहे. अरूण सचिव, विनोद तावडे यांनी दीर्घकाळ पक्षासाठी काम केल्यानंतर त्यांना संधी मिळाली आहे. अशात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्मृती ईराणींना तिकिट मिळालं नाही कारण पक्षाने जे लोकसभेत हारले आहेत अशांना तिकिट द्यायचं नाही असा निर्णय घेतला होता. स्मृती ईराणी या लोकसभेची निवडणूक हरल्या आहेत त्यामुळे त्यांना राज्यसभेचं तिकिट देण्यात आलं नाही असं सांगितलं जातं आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

हरदीप पुरींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज?

हरदीप पुरी आणि बी.एल. वर्मा यांचा राज्यसभेतील कार्यकाळ पुढील महिन्यात संपतो आहे. दोघंही केंद्रयी मंत्री आहेत. पण त्यांना राज्यसभेचं तिकिट देण्यात आलेलं नाही. त्यामुळे आता अशीही चर्चा आहे की त्यांचं मंत्रिपदही त्यांचा कार्यकाळ संपल्यावर काढून घेतलं जाईल. भाजपाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हरदीप पुरी यांच्या कामकाजाची पद्धत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पटलेली नाही. खासकरून इराण संकटाच्या काळात हरदीप पुरी यांनी योग्य ती भूमिका बजावली नाही असं त्यांना वाटतं आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांना पदावरून दूर केलं जाऊ शकतं. पुरी यांना दोनदा राज्यसभेवर पाठवण्यात आलं आहे. पुरी यांनी लोकसभा निवडणूकही लढवली होती पण ती ते हरले आहेत. आता नोव्हेंबर महिन्यात त्यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यानंतरही पुढचे सहा महिने ते मंत्री पदावर राहू शकतात. आता नेमकं त्यांच्या बाबतीत काय ठरवलं जाईल हे पाहणंही महत्त्वाचं असेल.