युनिटेक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजय चंद्रा यांना शुक्रवारी रात्री उशिरा दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आली. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. काही वर्षांपूर्वी ग्रेटर नोएडा येथील घरबांधणी प्रकल्पात युनिटेक कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खरेदीदारांची फसवणूक केल्याचा आरोप झाला होता. या खरेदीदारांनी २००६ मध्ये ग्रेटर नोएडामध्ये घरांसाठी पैसे भरले होते. एप्रिल २००८ मध्ये या घरांचा ताबा मिळेल, असे कंपनीतर्फे खरेदीदारांना सांगण्यात आले होते. मात्र, युनिटेक कंपनीला नियोजित वेळेत ग्राहकांना घरे देण्यात अपयश आले होते. गेल्यावर्षी दिल्लीतील न्यायालयाने याप्रकरणी युनिटेकविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. यापूर्वी जानेवारी २०१६ मध्येही संजय चंद्रा यांच्यासोबत युनिटेकचे अध्यक्ष रमेश चंद्रा, एमडी अजय चंद्रा आणि संचालिका मिनोती बाहरी यांना अटक झाली होती. त्यावेळी त्यांना एक दिवस तुरूंगात राहवे लागले होते. त्यानंतर ११ जानेवारी २०१६ रोजी या चौघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. त्यावेळी त्यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता.