United Airlines Flight Turned Back Over Bluetooth Bomb Prank: विमानात प्रवास करताना सुरक्षेच्या कारणास्तव मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांबाबत अत्यंत कडक नियम पाळले जात असतात. मात्र, एका १६ वर्षांच्या मुलाच्या खोडीमुळे युनायटेड एअरलाईन्सच्या विमानाला चक्क अटलांटिक महासागरावरून माघारी फिरावे लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विमानातील एका उपकरणाच्या ‘ब्लूटूथ’चे नाव ‘बॉम्ब’ असल्याचे समोर आल्यानंतर विमानामध्ये एकच खळबळ उडाली आणि सुरक्षेचा उपाय म्हणून विमान न्यू जर्सीमधील विमानतळावर तातडीने उतरवण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, युनायटेड एअरलाईन्सचे ‘फ्लाईट २३६’ हे बोईंग ७६७ विमान १९० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्ससह अमेरिकेच्या नेवाार्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून स्पेनमधील ‘पाल्मा डी मॅलोर्का’साठी रवाना झाले होते. विमान हवेत असताना विमानातील कर्मचाऱ्यांनी सर्व प्रवाशांना त्यांचे ब्लूटूथ बंद करण्याचे आवाहन केले. मात्र, वारंवार सांगूनही एक ब्लूटूथ कनेक्शन सातत्याने ॲक्टिव्ह दिसत होते आणि सर्वात भीतीदायक बाब म्हणजे, त्या ब्लूटूथ डिव्हाइसचे नाव ‘Bomb’ असे ठेवण्यात आले होते.
अन् विमान अटलांटिक महासागरावरून परत फिरवावं लागलं
विमानाच्या नियंत्रण कक्षाला याची माहिती मिळताच वैमानिक आणि क्रू मेंबर्स सतर्क झाले. विमान सुमारे दीड ते दोन तास पुढे निघून गेले होते आणि अटलांटिक महासागरावरून प्रवास करत होते. मात्र, सुरक्षेचा कोणताही धोका पत्करायचा नाही, असा निर्णय घेत वैमानिकाने विमान तातडीने मागे फिरवण्याचा निर्णय घेतला. रात्री ९.३७ च्या सुमारास हे विमान पुन्हा नेवाार्क विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले.
‘फिटबिट’मुळे उडाला सगळा गोंधळ!
विमान धावपट्टीवर उतरताच स्थानिक सुरक्षा यंत्रणा, ‘टीएसए’आणि एफबीआयच्या अधिकाऱ्यांनी विमानाचा ताबा घेतला. सर्व प्रवाशांना तातडीने विमानातून उतरवून त्यांची आणि त्यांच्या सामानाची कडक तपासणी करण्यात आली. सखोल तपासणीनंतर सुरक्षा यंत्रणांच्या हाती जे सत्य आले, ते पाहून सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला.
एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने त्याच्या हातातील ‘फिटबिट’ (Fitbit – फिटनेस बँड) या उपकरणाच्या ब्लूटूथचे नाव गंमत म्हणून ‘Bomb’ असे ठेवले होते. या एका नावामुळे संपूर्ण विमानात विनाकारण घबराट पसरली आणि कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.
एअरलाईन्सचे पत्रक आणि FBI कडून चौकशी सुरू…
युनायटेड एअरलाईन्सने या घटनेला दुजोरा दिला असून सुरक्षेच्या कारणास्तव विमान माघारी आणण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. या गोंधळानंतर प्रवाशांना दुसऱ्या विमानाने आणि नवीन क्रू मेंबर्ससह रविवारी सकाळी स्पेनला रवाना करण्यात आले. या प्रकरणी अद्याप त्या अल्पवयीन मुलावर कोणतीही कायदेशीर कारवाई किंवा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मात्र, अमेरिकेची गुप्तहेर संघटना ‘एफबीआय’ या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करत आहे. विमान वाहतुकीमध्ये अशा प्रकारची खोडसाळपणा महाग पडू शकतो, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
युनायटेड एअरलाईन्सच्या अडचणीत वाढच
गेल्या काही दिवसांत युनायटेड एअरलाईन्ससोबत घडलेली ही तिसरी मोठी घटना आहे. यापूर्वी एका विमानामध्ये प्रवाशाने गोंधळ घातल्यामुळे विमान वळवावे लागले होते, तर नेवार्क विमानतळावरच एका विमानाची ट्रकला धडक बसली होती. त्यातच आता या ‘ब्लूटूथ बॉम्ब’च्या अफवेमुळे एअरलाईन्स पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
