United Arab Emirates On iran : अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर भीषण हल्ले केले असून अमेरिका आणि इस्त्रायलच्या हल्ल्याने इराण हादरलं आहे. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणने आणखी आक्रमक होत इस्त्रायल आणि अमेरिकेच्या हवाई तळांवर प्रतिहल्ले केले आहेत. यामध्ये इराणने दुबई आणि अबू धाबीमधील अमेरिकेच्या काही हवाई तळांवरही हल्ले केले आहेत. त्यामुळे यूएईने इराणवर संताप व्यक्त केला आहे.

युएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांचे सल्लागार अन्वर गर्गश यांनी आखाती देशात इराणने केलेल्या हल्ल्यांचा तीव्र निषेध व्यक्त केला. त्यांनी म्हटलं की, “आखाती देशांविरुद्ध इराणच्या आक्रमकतेमुळे त्यांचं लक्ष्य चुकलं आणि एका महत्त्वाच्या वेळी इराण एकाकी पडलं. मात्र, तुमचं (इराणचं) युद्ध तुमच्या शेजारी राष्ट्रांशी नाही. हा तणाव वाढवून तुम्ही अशा लोकांच्या मतांना पुष्टी देत ​​आहात जे इराणला धोक्याचा मुख्य स्रोत मानतात आणि त्याचा क्षेपणास्त्र कार्यक्रम अस्थिरतेचं प्रतीक मानतात. तणावाचं वाढतं वर्तुळ आणखी वाढवण्यापूर्वी शुद्धीवर या. तुमच्या सभोवतालच्या परिस्थितीकडे लक्ष द्या आणि तुमच्या शेजारी राष्ट्रांशी तर्कशुद्ध आणि जबाबदारीने वागा”, अशा शब्दांत युएईने इराणला सुनावलं आहे.

इराणच्या अध्यक्षांचा इस्त्रायलला इशारा

अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूचा बदला घेण्याचा इशारा इराणने दिला. इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान म्हणाले की, “सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येचा बदला घेणं हे इस्लामिक रिपब्लिकचा हक्क आणि कर्तव्य आहे. इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण या गुन्ह्याच्या गुन्हेगारांचा आणि सूत्रधारांचा बदला घेणं हे कायदेशीर कर्तव्य आणि अधिकार मानतो”, असं मसूद पेझेश्कियान यांनी एका निवेदनात म्हटलं.

अयातुल्ला अराफी इराणचे नवे सर्वोच्च नेते

हल्ल्यात अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर आता अयातुल्ला अलीरेजा अराफी यांना तात्पुरते इराणचे नेतृत्व करण्यासाठी नियुक्त करण्यात आलं आहे. अराफी यांना नेतृत्व परिषदेचं कायदेतज्ज्ञ सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे आणि त्यांना सर्वोच्च नेत्याची भूमिका पार पाडण्याचं काम देण्यात आलं आहे, असे वृत्तसंस्था इराणी स्टुडंट्स न्यूज एजन्सी (ISNA) ने दिलं आहे.

अयातुल्ला अली खामेनी यांच्या उत्तराधिकारी होण्याच्या शर्यतीत अराफी हे प्रमुख आघाडीवर आहेत. ६७ वर्षीय हे एक अनुभवी धर्मगुरू आणि खामेनी यांचे जवळचे सहकारी आहेत. अराफी सध्या सर्वोच्च नेत्याची नियुक्ती करणाऱ्या तज्ञांच्या सभेचे उपाध्यक्ष म्हणून काम करतात. ते इराणच्या मदरसा प्रणालीचेही प्रमुख आहे.