सध्या भारतात करोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचं मोठं सकंट निर्माण झालेलं आहे. करोनाविरोधात भारताची संपूर्ण ताकदीनिशी लढाई सुरू आहे. मात्र दररोज लाखां संख्येत करोनाबाधित वाढत असल्याने, आरोग्य यंत्रणेवरील भार प्रचंड वाढला आहे. अनेक ठिकाणी रूग्णालयांमध्ये बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, रेमडेसिविर इंजक्शन, लस आदींचा तुटवडा भासत आहे. परिणामी रूग्णांचे हाल होत आहेत. अशा परिस्थितीत भारताच्या मदतीला जगभरातील अनेक देश पुढे आले आहेत. याच पार्श्वभूमीवर ब्रिटनने देखील करोनाविरोधातील या लढाईत भारताला मदत करण्याची भूमिका घेतली आहे.

ब्रिटनने आज(रविवार) घोषणा केली आहे की, ब्रिटन ६०० पेक्षा अधिक वैद्यकीय उपकरणं भारतात पाठवत आहे. या उपकरणांमध्ये ऑक्सिनज कंसंट्रेटर आणि व्हेंटिलेटर्सचा देखील समावेश आहे. ब्रिटनने म्हटले आहे की, हे पाऊल करोना विरोधातील लढाईत भारताच्या मदतीसाठी उचलण्यात आले आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी म्हटले आहे की, ”आम्ही एक मित्राच्या नात्याने आणि करोनाविरोधातील लढाईतील सहकारी म्हणून भारतासोबत उभा आहोत. या संकट काळात आम्ही भारत सरकारसोबत राहून काम करत राहू.”

हे खरं वसुधैव कुटुंबकम्! अमेरिकेपासून पाकिस्तानपर्यंत अनेक देशांचा भारताला मदतीसाठी पुढाकार!

अमेरिका, फ्रान्स, युरोप, ऑस्ट्रेलिया, चीन, पाकिस्तान, सिंगापूर, युएई या देशांनी आत्तापर्यंत भारताला मदत करण्याचं धोरण जाहीर केलं असून त्यासाठी सक्रीय पुढाकार देखील घेतला आहे. भारतात करोनाचा वेगाने प्रसार होऊ लागला असून शक्य ती सर्व मदत देण्याचं आश्वासन या देशांकडून दिलं जाऊ लागलं आहे. त्यामुळे भारताला करोनाविरोधातलं युद्ध लढण्यासाठी मदत मिळू शकेल, असा सूर जागतिक पटलावर उमटू लागला आहे.