scorecardresearch

काश्मीरप्रश्नी मध्यस्थीचे ‘पाक तुणतुणे’ मोडले

काश्मीर प्रश्नात संयुक्त राष्ट्रांनी मध्यस्थी करावी यासाठी पाकिस्तानने केलेले प्रयत्न पुन्हा एकदा असफल ठरले आहेत. भारत आणि पाकिस्तानने या वादावर चर्चेद्वारे कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे, असे संयुक्त राष्ट्राने स्पष्ट केले आहे.

काश्मीरप्रश्नी मध्यस्थीचे ‘पाक तुणतुणे’ मोडले

काश्मीर प्रश्नात संयुक्त राष्ट्रांनी मध्यस्थी करावी यासाठी पाकिस्तानने केलेले प्रयत्न पुन्हा एकदा असफल ठरले आहेत. भारत आणि पाकिस्तानने या वादावर चर्चेद्वारे कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे, असे संयुक्त राष्ट्राने स्पष्ट केले आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र व्यवहार सल्लागार सरताज अझिझ यांनी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की-मून यांना पत्राद्वारे सीमेवरील सध्याच्या स्थितीची कल्पना दिली आणि संयुक्त राष्ट्रांनी मध्यस्थी करण्याची मागणी केली. त्यामुळे काश्मीरचा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा प्रयत्न करण्यासाठी अझिझ यांनी पावले उचलल्याचे मानले जाते.
काश्मीर प्रश्नावर शांततापूर्ण वातावरणात तोडगा निघावा यासाठी संयुक्त राष्ट्रांची भूमिका महत्त्वाची आहे आणि त्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांनी आपल्या पदाचा वापर करावा, असे अझिझ यांनी बान की-मून यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या सीमेवर हिंसाचाराचा जो उद्रेक झाला त्याबद्दल मून यांनी चिंता व्यक्त केली आहे. या स्थितीमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आणि अनेक जण बेघर झाले त्याबद्दलही मून यांनी दु:ख व्यक्त केले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतही याच प्रश्नावरून दोन देशांमध्ये शाब्दिक युद्ध पेटले होते.

चर्चेत विषयांतर करण्याची पाकिस्तानची क्लृप्ती
 नवी दिल्ली : काश्मीरसह विविध प्रश्नांवर पाकिस्तानशी गंभीर चर्चा करण्याची भारताची तयारी आहे. मात्र पाकिस्तानलाच चर्चेत स्वारस्य नसल्याने ते संयुक्त राष्ट्रांकडे तक्रारी करून विषयांतर करण्याच्या क्लृप्त्या करीत आहेत, असे भारताने म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय सीमा आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्ताने त्वरेने पावले उचलावी आणि दहशतवादाला खतपाणी घालणे थांबवावे, अशी मागणी भारताने केली आहे.सिमला करार आणि लाहोर जाहीरनामा यांच्या चौकटीत राहूनच भारत आणि पाकिस्तानमधील सर्व प्रश्न सोडविण्याच्या भारताच्या भूमिकेचा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी पुनरुच्चार केला असून त्यामध्ये तिसऱ्याची लुडबूड सहन केली जाणार नाही, असेही स्पष्ट केले आहे.

दहशतवादाच्या सावटाखाली शांततेवर चर्चा अशक्यच
संयुक्त राष्ट्रे :  दहशतवादाच्या सावटाखाली  शांतता चर्चा शक्य नसल्याचे भारताने मंगळवारी स्पष्ट केले. पाकिस्तान शिष्टमंडळाने मुद्दा उपस्थित केल्यानंतर शुक्रवारी वसाहतवाद संपुष्टात आणण्याबाबत मांडलेल्या भूमिकेवर भारताने मंगळवारीही ठाम असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेसमोर सांगितले.जम्मू-काश्मीरचा ठराव झाल्याशिवाय वसाहतवाद संपुष्टात आणण्याचा संयुक्त राष्ट्रांचा कार्यक्रम अपुरा आहे आणि हा मुद्दय़ांवर तोडगा काढण्यास दिल्लीशी चर्चा करण्याची इस्लामाबादची इच्छा आहे, असे पाकिस्तान राजनैतिक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते.
जम्मू-काश्मीर प्रश्नावर सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध सुधारणे आवश्यक आहे. त्यासाठी भारताशी व्यापक संवाद साधण्याची आमची तयारी आहे. शांततापूर्ण तोडगा हाच काश्मीर मुद्दय़ावर उपाय आहे. त्यातूनच दक्षिण आशियात शाश्वत शांती आणि स्थैर्य निर्माण होऊ शकेल, असे राजनैतिक अधिकाऱ्याने स्पष्ट केले.  संयुक्त राष्ट्रांतील भारताचे सचिव अभिषेक सिंह यांनी पाकिस्तान राजनैतिक अधिकाऱ्यांनी केलेला ‘असमर्थनीय’ दावा फेटाळून लावला. ते म्हणाले की, दहशतवादाच्या सावलीखाली असताना पाकिस्तानशी काश्मीर मुद्दय़ावर चर्चा करणे शक्य नाही. सीमेवरील दहशतवाद कायमचा नष्ट करून मगच चर्चेचा मार्ग अवलंबता येईल, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात केलेल्या भूमिकेची आठवण पाकिस्तानी अधिकाऱ्यांना असेलच. त्यामुळे दहशतवाद आणि शांतता या गोष्टी हातात हात घालून चालू शकणार नाहीत.
पाकिस्तान जगातील कोणत्याही स्वरूपातील दहशतवादाचा पूर्णपणे निषेध करीत आहे. पण जर दहशतवादाच्या नावाखाली काश्मीरमधील जनतेच्या स्व-निर्धाराला आणि हक्कांना दुर्लक्षित करता येणार नाही, असेही या वेळी पाकिस्तानच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-10-2014 at 12:53 IST

संबंधित बातम्या