संयुक्त राष्ट्र : युक्रेनमधील युद्ध संपवून रशियाने आपले सैन्य मागे घ्यावे, अशी मागणी करणारा गैरबंधनकारक ठराव संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने मंजूर केला. भारताने मात्र तटस्थ राहून या ठरावावर मतदान केले नाही. या ठरावाद्वारे युक्रेनमध्ये व्यापक, न्याय्य व चिरस्थायी शांतता प्रस्थापित करण्याची गरज अधोरेखित केली गेली.

या ठरावावर संयुक्त राष्ट्र आमसभेच्या १९३ सदस्य राष्ट्रांपैकी ३२ देशांनी मतदान केले नाही. त्यात भारतही होता. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत ‘युक्रेनमध्ये व्यापक, न्यायसंगत व कायमस्वरुपी शांतता प्रस्थापनेसाठी संयुक्त राष्ट्रांची सनद (चार्टर) सिद्धांत’ ठराव मंजूर करण्यात आला. या प्रस्तावाच्या बाजूने १४१ मते पडली, तर सात मते विरोधात पडली. या युद्धाच्या एक वर्षांनंतरही युक्रेन व रशिया या दोघांनाही मान्य असलेला तोडगा शोधण्यास जगाला यश आले आहे का, असा सवाल मात्र भारताने उपस्थित केला.

hotel Solapur district
सोलापूर : हॉटेल व्यवस्थापनाच्या नावाखाली मित्राला ६८ लाखांचा गंडा, अक्कलकोटमध्ये दागिने लंपास
vladimir putin threatens nuclear war
युक्रेनमध्ये सैन्य पाठवल्यास जागतिक अण्वस्त्र संघर्षांचा पुतिन यांचा इशारा
First Secretary Anupama Singh
“जम्मू-काश्मीरच्या प्रकरणात…”, भारताच्या प्रतिनिधी अनुपमा सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले खडे बोल
indus waters treaty
विश्लेषण : शहापूरकंडी धरणाद्वारे भारताने पाकिस्तानमध्ये जाणारा रावी नदीचा प्रवाह का रोखला? याचा जम्मू व काश्मीरला कसा फायदा होईल?

 हा ठराव मंजूर झाल्यानंतर भारताच्या बाजूने स्पष्टीकरण देताना, संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज म्हणाल्या, की युक्रेन संघर्षांला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे आमसभेने स्वत:ला काही प्रश्न विचारणे महत्वाचे आहे. आम्ही युक्रेन व रशिया या दोघांनाही मान्य असलेल्या संभाव्य तोडग्यापर्यंत पोहोचलो आहोत का? रशिया व युक्रेन या दोन्ही बाजूंचा सहभाग नसलेली कोणत्याही प्रक्रियेतून आपल्याला विश्वासार्ह व सार्थ तोडगा मिळू शकणार आहे का? जागतिक शांतता आणि सुरक्षेच्या समकालीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाची यंत्रणा आणि विशेषत: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद कुचकामी ठरली नाही का? युक्रेनमधील परिस्थितीबद्दल भारताला अतीव चिंता वाटते.

कंबोज म्हणाल्या, की युक्रेन-रशिया संघर्षांत असंख्य नागरिक मृत्युमुखी पडले. लाखो लोक बेघर झाले आहेत. अनेकांना शेजारच्या देशांत आश्रय घेणे भाग पडले आहे.  नागरी  सुविधांवरील हल्ल्यांच्या बातम्याही चिंताजनक आहेत. भारत बहुपक्षवादासंदर्भात कटिबद्ध आहे व संयुक्त राष्ट्र सनदेच्या तत्त्वांना मानतो. आम्ही नेहमीच संवाद आणि मुत्सद्देगिरी ही एकमेव व्यवहार्य पद्धत मानतो. आजच्या ठरावात नमूद केलेली उद्दिष्टे लक्षात घेता, संघर्षग्रस्त भागात कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठीच्या अंतर्निहित मर्यादा लक्षात घेऊन आम्ही या ठरावापासून दूर राहण्यासाठी विवश आहोत.

भारत वर्षभर ठरावांपासून अलिप्तच!

संयुक्त राष्ट्र आमसभेचे ठराव हे प्रतिकात्मक असतात. सुरक्षा परिषदेतील ठरावांप्रमाणे बंधनकारक नसतात. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून, संयुक्त राष्ट्रसंघ आमसभा, सुरक्षा परिषद आणि मानवाधिकार परिषदेतील अनेक ठरावांद्वारे या आक्रमणाचा निषेध करण्यात आला आहे. तसेच युक्रेनचे सार्वभौमत्व, स्वातंत्र्य, एकात्मता व आणि प्रादेशिक अखंडतेसाठी वचनबद्धता याद्वारे अधोरेखित केली आहे. युक्रेनवरील रशियन आक्रमणानंतर गेल्या वर्षभरात आपत्कालीन विशेष सत्रांतर्गत महासभेची सहा वेळा बैठक झाली आहे. भारताचे रशियाशी चांगले संबंध असून, युक्रेनवरील संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांपासून भारत आतापर्यंत अलिप्त राहिला आहे. परंतु संयुक्त राष्ट्रांची सनद, आंतरराष्ट्रीय कायदा व देशाचे सार्वभौमत्व व प्रादेशिक अखंडतेचा आदर करण्याची गरज भारताने सातत्याने अधोरेखित केली आहे. शत्रुत्व भावना रोखण्यासाठी संवाद व मुत्सद्देगिरीद्वारे सर्व प्रयत्न केले जावेत, असे आवाहनही भारताने केले आहे.

झेलेन्स्की यांचा रशियावर विजयाचा निर्धार

कीव्ह : युक्रेनवरील रशियन आक्रमणास वर्षपूर्ती झाल्यानिमित्त युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी २०२३ मध्ये विजयासाठी सर्वतोपरी, सर्व शक्तिनिशी प्रयत्न करण्याची निर्धार केला. 

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याला शुक्रवारी एक वर्ष पूर्ण झाले. हे युद्ध थांबवण्यासाठी अद्याप कोणताही तोडगा दृष्टिपथात आलेला नाही. झेलेन्स्की यांनी यानिमित्त चित्रफितीद्वारे केलेल्या संबोधनात सांगितले, की हे युद्ध दुसऱ्या महायुद्धानंतरचे युरोपमधील सर्वात मोठे व प्राणघातक युद्ध आहे. ही रशियाने पसरवलेली दहशत आहे. उद्या काय होईल हे आम्हाला ठाऊक नाही. परंतु आम्हाला स्पष्टपणे समजले आहे की प्रत्येक उद्यासाठी तुम्हाला संघर्ष करणे आवश्यक आहे. आम्ही तसे लढलो आहोत. लढत आहोत. झेलेन्स्की यांनी ‘ट्वीट’मध्ये नमूद केले, की युक्रेनियन नागरिकांनी ते ‘अजिंक्य’ असल्याचे सिद्ध केले आहे. आम्हाला आता खात्री आहे, की २०२३ हे आमच्या विजयाचे वर्ष असेल.

या संघर्षांच्या वर्षपूर्तीनिमित्त युक्रेनियन नागरिकांनी युद्धात मारल्या गेलेल्या हजारो देशबांधवांच्या स्मरणार्थ मेणबत्त्या फेरी, शोकसभा आयोजित केली. 

 विदेशांतही मृतांना श्रद्धांजली

युक्रेनमधील मृतांच्या स्मृतीला विदेशांतही श्रद्धांजली वाहण्यात आली. पॅरिसमधील जगप्रसिद्ध आयफेल टॉवर युक्रेनच्या प्रतिकात्मक पिवळय़ा व निळय़ा रंगात उजळवण्यात आला होता. गेल्या वर्षभरात रशिया-युक्रेन या दोन्ही बाजूंच्या मृत्यूची आकडेवारी भयावह आहे. या युद्धात हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे आणि हजारो लोक जखमी झाले आहेत.