संयुक्त राष्ट्रे : अमेरिकेत ११ सप्टेंबर २००१ रोजी  झालेल्या हल्ल्याच्या विसाव्या स्मृतीदिनानिमित्त  वेगवेगळ्या ठिकाणी श्रद्धांजली कार्यक्रम झाले असून वीस वर्षांपूर्वी दहशतवादमुक्त जगासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचा व्यक्त केलेला निर्धार अजूनही कायम असल्याचे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनियो गट्रेस यांनी सांगितले.

गट्रेस यांनी सांगितले की, ‘‘हा दिवस अतिशय कटू स्मृतींना उजाळा देणारा असून या हल्ल्यातील मृतांना आपण श्रद्धांजली वाहत आहोत. संबंधित कुटुंबीयांच्या वेदना कधीही कमी होणार नाहीत. यावेळी काहींनी अतुलनीय असे धैर्य दाखवले होते. ज्या लोकांनी या हल्ल्यात प्राण गमावले त्यांच्या कुटुंबीयांच्या आम्ही पाठीशी आहोत. त्यांच्या हक्कांच्या रक्षणासाठी वचनबद्ध आहोत.’’ संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाने म्हटले आहे की, दोन दशकांपूर्वी ते दहशतवादाविरोधात जेवढे एक होते तेवढेच आताही आहेत. सुरक्षा मंडळाने त्यावेळीही या हल्ल्यांचा तातडीने निषेध केला होता. सुरक्षा मंडळाच्या सदस्यांनी  न्यूयॉर्क शहरातील या हल्ल्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या  संग्रहालयास भेट दिली.